नवी दिल्ली – भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी नरेश टिकैत आणि नातेवाईकांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. आरोपीचे नाव विशाल असून तो दिल्लीचा रहिवासी असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. याबाबतचा अधिकचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
आरोपी तरुण दिल्लीतील नजफगढ येथील महेश गार्डनमधील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शेतकरी नेते टिकैत आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीनंतर एकच खळबळ उडाली होती.
पकडण्यात आलेला आरोपी शेतकरी आंदोलनात देखील सामील झाला होता. हा आरोपी सध्या ड्राइव्हरचे काम करत होता. दिल्लीतून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस अधिकचा तपास करत आहेत.
टिकैत यांच्या कुटुंबीयांना अन्य राज्यांतील पंचायतींमध्ये सहभागी करून घेण्यासाठी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. त्यांचा मुलगा गौरव टिकैत याच्या मोबाईलवर धमकीचे फोन आले होते. या प्रकरणी भाऊरकाल पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. तसेच टिकैत यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून सुरक्षेची मागणी देखील केली आहे.
आम्ही समाजाला जोडण्याचे काम करतो. शेतकऱ्यांचे प्रश्न यापुढेही मांडले जातील.धमकी देणाऱ्या व्यक्तीने पुढे येऊन आपल्या समस्या सांगाव्यात असं आवाहन टिकैत यांनी धमकीनंतर केले होते. यानंतर पोलिसांनी धमकी देणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या.