पुणे – येथील हिंदमाता प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय काँग्रेस (आय) यांच्या वतीने घेण्यात आलेल्या नाट्य महोत्सवातील नाटकांना ‘हाऊसफुल’चे फलक लागत आहेत. या महोत्सवाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याने बालगंधर्व रंगमंदिर गेले पाच दिवस प्रेक्षकांच्या उपस्थितीने तुडुंब भरल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेले पु. ल. देशपांडे यांना हा नाट्य महोत्सव समर्पित करण्यात आला असून याचा प्रारंभ सोमवारी (दि. २५) झाला. ‘यदा कदाचित रिटर्न्स’ या गाजलेल्या नाटकाने महोत्सवाचा प्रारंभ झाला. त्यानंतर एका लग्नाची पुढची गोष्ट, हीच तर फॅमिलीची गंमत आहे, मर्डरवाले कुलकर्णी या विनोदी आणि गंभीर विषयांवरील नाटकांबरोबरच गौतमी पाटील यांचा कलाविष्कारही या महोत्सवात आजवर सादर झाला आहे.
बालगंधर्व रंगमंदिर येथे ३१ डिसेंबरपर्यंत हा महोत्सव चालणार असून, तो सर्वांसाठी विनामूल्य आहे. याचा अधिकाधिक प्रेक्षकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले. नाटकाच्या मोफत प्रवेशिका आमदार रवींद्र धंगेकर यांचे जनसंपर्क कार्यालय, रविवार पेठ येथे उपलब्ध आहेत. दरम्यान, महिला बचत गटांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी महोत्सव स्थळी खाद्य महोत्सवही घेण्यात आला आहे. यासाठी महिला बचत गटांना मोफत स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशीही माहिती आयोजकांच्या वतीने प्रतिभा धंगेकर यांनी दिली.