भोर-कापूरहोळ रस्त्यावर माती वाहून नेणारे डंपर वाढले
भाटघर – भोर-कापूरहोळ रस्ता अतिवर्दळीचा असून, भाटघरच्या कुशीतील माती वाहतूक करणारे डंपर भोर-कापूरहोळ रस्त्यावर वेगाने जात असल्याने अपघाताची शक्यता अधिक वढली आहे. सध्या या परिसरात मांढरदेवी यात्रा सुरू असून, मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. राज्यातील अनेक ठिकाणाहून भाविक हजेरी लावत असतात, यामुळे या महिन्यात हा रस्ता गजबजलेला दिसून येतो.
त्यातच यावर्षी मातीच्या डंपरने हजेरी लावल्याने रस्त्यावर वाहन चालवणे कठीण झाले आहे. डंपर वेगाने जात असल्याने समोरील वाहनचालक बिचकत वाहने चालवत आहेत. डंपर अतिवेगाने जात असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. संबधित विभागाने याची दखल घेऊन या बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे अशी चर्चा वाहनचालक व स्थानिक नागरिक करीत आहेत.
भोर-कापूरहोळ हा रस्ता पुणे शहराकडे जात असल्याने तालुक्यात महत्त्वाचा मानला जातो. या रस्त्याने दररोज ये-जा करणारी वाहने, बाहेरील पर्यटकांची वाहने, तसेच सध्या मांढरदेवीची यात्रा चालू असल्याने वर्दळीत अजून भर पडली आहे. रस्त्याच्या शेजारील धोकादायक जुनाट झाडे, अरुंद मोऱ्या यांमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे.
त्यातच आता भोर-कापूरहोळ रस्त्यावर माती वाहतूक करणारे डंपर पाहावयास मिळत असल्याने रस्ता प्रवासासाठी अधिकच धोकादायक ठरत आहे. भोर-कापूरहोळ रस्ता सद्यःस्थितीत खड्डेमुक्त असला तरी या रस्त्यावर मातीचे डंपर सतत ये-जा करीत असल्याने खड्डे पुन्हा उखडण्याची शक्यता आहे, यामुळे वाहनचालकांना व स्थानिक नागरिकांन ापुन्हा खड्ड्यांचा सामना करावा लागणार आहे.