“शोले’सारखी राष्ट्रवादीची गत

मुख्यंत्री फडणवीस यांचा घणाघात : इंदापूर येथे हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ सभा

रेडा- हर्षवर्धन पाटलांना बारामतीचे नेते येऊन त्रास देतात. मात्र, या नेत्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मी बारामतीला निघालेलो आहे. आता बारामतीच्या साहेबांच्या पाठीशी कोणीच उभे राहिलेले दिसत नाही. अगदी “शोले’ चित्रपटासारखी राष्ट्रवादी कॉंग्रेसची गत झाली आहे.

इंदापूर विधानसभेतील महायुतीचे भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ इंदापूर येथे आयोजित सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, बाळासाहेब घोलप, इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा, कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पद्मा भोसले, बाबासाहेब चवरे, माऊली वाघमोडे, नानासाहेब शेंडे, रामभाऊ पाटील, मुरलीधर निंबाळकर, अशोक वनवे, मारुती वनवे, गजानन वाकसे, भीमराव भोसले यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी व तालुक्‍यातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काठी व घोंगडे देऊन सन्मान करण्यात आला.

  • हर्षवर्धन पाटील द्या, तुम्हाला विकास देतो
    मी हर्षवर्धन पाटलांना वीस वर्षांपासून ओळखतोय, त्यांनी कधीही विरोधकांवर चुकीचा वार केला नाही. उलट विरोधकांना सोबत घेऊन चालायचे व त्यांना मदत करायची असा जनतेचा नेता भाजपला मिळाला आहे. त्यामुळे तुम्ही मला हर्षवर्धन पाटील द्या, मी तुम्हाला विकास देतो, तसेच इंदापूर तालुक्‍यातील पाण्याची जबाबदारी मी घेतोय, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
  • धरण भरण्याची “ती’ पद्धत मान्य नाही
    जे माजी जलसंपदामंत्री होते त्यांनी सिंचनामध्ये काय केले हे मला सांगण्याची गरज नाही. व त्यांचे धरण भरण्याची पद्धत ही वेगळी होती, हे आम्हाला अजिबात मान्य नाही, असा मिश्‍किलपणे टोमणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता लगवला.
  • माझ्यावर टीका केली जाते स्वार्था करीता भाजपमध्ये प्रवेश केला; परंतु माझा भाजप प्रवेश हा स्वार्थाकरिता नाहीतर तालुक्‍याच्या विकासासाठी आहे हे विरोधकांनी लक्षात ठेवावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्‍याचा चौफेर विकास करणार आहे. व आगामी काळात जी जबाबदारी भाजपकडून देण्यात येईल ती जबाबदारी सांभाळायला तयार आहे.
    – हर्षवर्धन पाटील, उमेदवार, भाजप, इंदापूर विधानसभा

Leave A Reply

Your email address will not be published.