राम मंदिरावर नवा तोडगा! मान्य होण्याची शक्‍यता !!

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर बाबारी मस्जीद वादातील मध्यस्थांनी सर्वोच्च न्यायालयात नवा प्रस्ताव दाखल केला आहे, या माहितीला सुन्नी वक्‍फ बोर्डाने दुजोरा दिला आहे.

1992 मध्ये कारसेवकांनी बाबरी मस्जीदीचे पतन केले. त्यापुर्वी तेथे असणाऱ्या मस्जीदीच्या जागेवरील आपला हक्क उत्तर प्रदेश सुन्नी वक्‍फ बोर्डाने सोडून द्यायाचा आहे, त्याबदल्यात पुर्वी मंदिर असल्याचा दावा असणाऱ्या वादग्रस्त जागांवरील मशिदींची स्थिती 15 ऑगस्ट 1947ला असेल त्याप्रमाणे धार्मिक स्थळे (विशेष तरतुदी) कायदा 1991 नुसार ठेवायची. भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेल्या मशिदींमध्ये नमाजाला परवानगी द्यायची, अशा तरतुदींचा प्रस्तावात समावेश असल्याचे समजते.

सर्वोच्च न्यायालयात अयोध्या प्रश्‍नावर 40 दिवस युक्तीवाद झाल्यानंतर ही घडामोड बुधवारी घडली आहे. या मध्यस्थांमध्ये सर्वोच्च न्यायलयाचे माजी न्यायधिश एफएम कलीफुल्ला, मध्यस्थी तज्ज्ञ श्रीराम पांचू यांचा समावेश होता. त्यांनी आपला हा अहवाल बुधवारी औपचारिकपणे सर्वोच्च न्यायलयापुढे सादर केला असला तरी दोन दिवसांपुर्वी तो देण्यात आला होता. असा तोडगा प्रस्ताव आला असल्याचे सुन्नी वक्‍फ बोर्डाच्या वकिलांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायलयाच्या आवारात पत्रकारांना ऍड. शाहीद रिझवी म्हणाले, मध्यस्थांच्या दुसऱ्या फेरीतील चर्चेनंतर हा नवा प्रस्ताव समोर आला आहे. याला उशीर झाला असे वाटत नाही का? असे विचारता ते म्हणाले, याला खूप उशीर झाला आहे, असे मला वाटत नाही. तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल तर ती तुम्ही अखेरच्या क्षणीही करू शकता. मला आशा आहे, ज्या पक्षकारांनी या प्रस्तावाला अद्याप मान्यता दिली नाही ते ही या प्रस्तावाचा विचार करतील आणि त्यावर स्वाक्षरी करतील.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भारताची एकात्मता. देशाचा विकास आणि नवा बदल यासाठी मी प्रस्तावावर आशावादी आहे. कारण अन्य खटल्यांसारखा हा खटला नाही, ज्यात एक पक्ष जिंकतो तेंव्हा दुसरा हरतो. हा इतिहासाला कलाटणी देणारा खटला आहे. हा इतिहास बदलू शकतो, असे ऍड. रिझवी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.