तळेगाव ढमढेरे- शिक्रापूरमध्ये करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे परिसरातील पाच किलोमीटर बफर झोन करण्यात आला असून, टाकळी भीमा येथील वाड्या वस्त्यांमध्ये येण्या-जाण्याचे रस्ते बंद करण्यात आले आहेत.
करोना व्हायरसमुळे सर्वत्र लॉकडाऊन केले आहे. त्याचप्रमाणे टाकळी भीमा गावातील नागरिकांनी वाड्या-वस्त्या बंद केल्या असून, मुख्य रस्त्यावर दरवाजा केला आहे. बाहेर गावाहून येणाऱ्या व्यक्तीला गावात येण्यास मनाई करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील बरेच नागरिक घरात बसून राहत नाही. अशांवर शिक्रापूर पोलिसांनी काठ्यांचा प्रसाद, भर चौकात उठाबशा, भर उन्हांत विनाचप्पल तापत्या डांबरावरून चालत जाण्याच्या शिक्षा केल्या आहेत. नागरिक पेट्रोल पंपावर गर्दी करताना दिसत आहेत. करोनाचा सामना करण्यासाठी नागरिकांना घरात बसण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापुढे विनाकारण नागरीक घराबाहेर फिरताना दिसल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी यांनी दिला आहे.