खोकला तरी पोलिसांना फोन

पोलिसांचे काम वाढले : साडेतीन हजारांवर गुन्हे दाखल
पिंपरी : “करोना’मुळे सध्या शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. गुन्हे कमी झाले की पोलिसांचे काम कमी होणे अपेक्षित आहे. परंतु “करोना’मुळे पोलिसांच्या कामात भरच पडत असल्याचे दिसून येत आहे. 

सध्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालयातील नियंत्रण कक्षात दिवसाला सरासरी 75 ते 80 फोन येत आहेत. यामध्ये गर्दी केल्याचे सर्वाधिक फोन आहेत. आमचा शेजारी सारखा खोकतोय, अशी तक्रार करणारे फोनही पोलिसांना येत आहेत. यामुळे पोलिसांची चांगलीच दमछक होत आहे.

गुन्हेगारांऐवजी सर्वसामान्य नागरिकांना आवरण्यात आणि घरी पाठविण्यातच पोलिसांचा वेळ जात आहे. त्यातच कंट्रोल रुमला रोज 70 ते 80 फोन येत असल्याने पोलिसांची धावपळ वाढली आहे. साडे तीन हजार जणांवर गुन्हे दाखल करुनही विनाकारण फिरणाऱ्यांच्या मागे पोलिसांना धावावे लागत आहे.

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन, संचारबदी लागू केली आहे. या कालावधीत प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तीन हजार 511 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी “लॉकडाऊन’ व संचारबंदी करण्यात आली. सुरवातीच्या काळात सूचना देऊनही दुकाने व कार्यालये सुरू ठेवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. पोलिसांनी कारवाई करूनही आत्तापर्यंत विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. यामुळे पोलिसांनी आपल्या कारवाईचा वेग आणखी वाढविला आहे. सोमवारी आत्तापर्यंतची एका दिवसातील सर्वात मोठी म्हणजे 224 जणांवर कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी तीन हजार 511 जणांवर भा. द. वि. कलम 188 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

दीड हजार वाहने जप्त
संचारबंदीच्या काळात मोकाट फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरवात केली. मात्र फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याने पोलिसांनी पेट्रोल पंप चालकांना सूचना देऊन फक्‍त अत्यावश्‍यक सेवेतील वाहनांना ओळखपत्र पाहून इंधन देण्याच्या सूचना दिल्या. तरीदेखील दुचाकीवरून फिरणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नव्हती. अखेर पोलिसांनी वाहन जप्तीचे अस्त्र उचलले. सुरुवातीला वाकड पोलिसांनी एकाच दिवशी 50 तर चिखली पोलिसांनी 27 वाहने जप्त केली. त्यानंतर विविध पोलीस ठाण्यांमध्ये आत्तापर्यंत एक हजार 449 वाहने जप्त केल्याची नोंद आहे.

मास्क न वापरणाऱ्या 167 जणांवर कारवाई
मास्क वापरल्यास करोनाचा प्रसार रोखण्यास मदत होते. यामुळे सर्व नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क वापरणे शासनाने बंधनकारक केले. मात्र तरीही अनेकजण मास्कशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याचे दिसून आले आहे. मास्क न वापरणाऱ्यांच्या विरोधात गेल्या चार दिवसात विविध पोलीस ठाण्यांमध्ये 167 गुन्हे दाखल केले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.