Amir Khan and Darsheel Safary| बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यात ईशान अवस्थी नावाच्या लहान मुलाची कथा दाखवण्यात आली होती. ही भूमिका अभिनेता दर्शिल सफारी याने साकारली होती. त्याच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. आजही हा चित्रपट प्रेक्षक तेवढ्याच आनंदाने पाहतात. मात्र आमिर आणि दर्शिलची ही जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहे. तब्बल 16 र्षांनंतर दर्शिल आमिरसोबत कमबॅक करणार आहे.
दर्शिलने 4 मार्च रोजी इंस्टाग्रामवर दोन फोटोंचा कोलाज शेअर केला, ज्यामध्ये आमिरही त्याच्यासोबत दिसत आहे. पहिला फोटो ‘तारे जमीन पर’ चित्रपटाचा आहे आणि दुसरा लेटेस्ट फोटो आहे. नव्या चित्रात आमिर पूर्णपणे वेगळ्या स्टाईलमध्ये दिसत आहे. तो सूट आणि पॅन्टमध्ये दिसत आहे. तो लांब केस आणि दाढीसह लूकमध्ये दिसत आहे. हा फोटो शेअर करताना दर्शीलने कॅप्शनमध्ये लिहिले की, “16 वर्षांनंतर आम्ही पुन्हा एकत्र आहोत. थोडा भावूकही दिसतोय. माझ्या अनुभवासाठी माझ्या आवडत्या गुरूला खूप प्रेम.”
View this post on Instagram
त्याने पुढे लिहिले की चार दिवसांनी मोठी घोषणा होणार आहे. आमिर आणि दर्शिलआता एकत्र का आले आहेत? दोघेही चित्रपट करत आहेत का? अशा सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी आता चार दिवस वाट पाहावी लागणार आहे. मात्र, ‘तारे जमीन पर’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटाने जगभरात 98.48 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा या जोडीला पाहण्यासाठी चाहते देखील आतुर झाले आहेत.
दरम्यान, अमिरचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट यशस्वी कामगिरी करू शकला नाही. नुकताच त्याच्या निर्मितीत बनलेला ‘मिसिंग लेडीज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. याशिवाय तो ‘लाहोर 1947’ हा चित्रपटही बनवत आहे, ज्यामध्ये सनी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय तो ‘सीतारे जमीन पर’ नावाचा चित्रपटही घेऊन येत आहे.