पार्ल : दक्षिण आफ्रिके विरुद्धची एकदिवसय मालिका ही टीम इंडियाची 2022 मधील पहिली एकदिवसीय मालिका असेल. वर्ष जसजसे पुढे सरकत जाईल तसतसे भारत आणखी बर्याच एकदिवसीय मालिका खेळणार आहे.
त्यामुळ भारत नव्या वर्षाची सुरुवात विजयाने करण्यात उत्सुक असले. या एकदिवसीय मालिकेची सुरुवात 19 जानेवारीपासून होणार आहे. पहिले दोन सामने पार्लमध्ये खेळवले जातील तर केपटाऊनमध्ये तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना खेळवला जाईल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही देशांनी आपापल्या एकदिवसीय संघांची घोषणा केली आहे. भारताचे नेतृत्व केएल राहुल करेल, तर टेंबा बावुमा आफ्रिकेचा कर्णधार असेल. दोन्ही संघात काही क्लास खेळाडू आहेत जे ही मालिका रोमांचक बनवतील.
या मालिकेला सुरुवात करताना आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत भारत चौथ्या तर यजमान पाचव्या स्थानावर आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही लेखातून तीन महत्वाच्या खेळाडूंच्या लढतींवर प्रकाश टाकणार आहोत जे या एकदिवसीय मालिकेत रंगत वाढवतील.
1) विराट कोहली विरुद्ध कागिसो रबाडा
जेव्हा जेव्हा भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना झाला आहे तेव्हा तेव्हा विराट कोहीली आणि कासिगो रबाडा यांच्यात जोरदार लढती झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून रबाडाने गेल्या काही वर्षांत मोठी प्रगती केली आहे.
तर कर्णधारपदाच्या दबावातून मुक्त झाल्यामुळे कोहली पूर्वीपेक्षा चांगली फलंदाजी करण्याच्या अपेक्षा आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या अनुपस्थितीत रबाडा विरुद्ध कोहली यांच्यातील लढत हा एकदिवसीय मालिकेचा महत्वाचा भाग असणार आहे.
2) जसप्रीत बुमराह विरुद्ध क्विंटन डी कॉक
या एकदिवसीय मालिकेत मुंबई इंडियन्समध्ये सहकारी असलेले जसप्रीत बुमराह आणि क्विंटन डी कॉक विरुद्ध संघातून खेळणार आहेत. दोन्ही खेळाडू त्यांच्या आयपीएल फ्रँचायझीसाठी खेळताना चांगले मित्र झाले आहेत परंतु जेव्हा हे दोन्ही खेळाडू एकदिवसीय मालिकेत आमनेसामने येतील तेव्हा या मैत्रीला कुठेतरी ब्रेक लागेल.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी डी कॉकने नुकतेच आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे डी कॉक भारतासाठी अंत्यत धोकादयक ठरु शकतो. दुसरीकडे कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करणारा जसप्रीत बुमराह तुफान फॉर्ममध्ये असल्याने क्विंटन डी कॉकसह दक्षिण आफ्रिकेला बुमराहचे आव्हान पेलणे सोपे असणार नाही.
3) डेव्हिड मिलर विरुद्ध युझवेंद्र चहल
दुबईतील टी-20 विश्वचषकाला मुकल्यानंतर चहल भारतीय संघात पुनरागमन करत आहे. त्यामुळे चहलकडे स्वाताला सिद्ध करण्याची संधी आहे. दुसरीकडे डेव्हिड मिलरलाही दक्षिण आफ्रिकेसाठी मधल्या फळीत धावा करण्याची जबाबदारी पार पाडावी लागेल.
यावेळी त्याला मधल्या फळीत फलंदाजी करताना चहलच्या फिरकीचा सामना करावा लागेल.
मिलरचा नेहमीच फिरकीपटूंचा सामना करण्याची आवड असल्याने, चहल आणि मिलर यांच्यातील रंगतदार लढत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.