टोकियो – करोनाचा धोका जपानमध्येही पुन्हा एकदा वाढत आहे. त्यातच देशातील लसीकरणाचा वेगही अत्यंत कमी आहे. त्यामुळे येथे होत असलेली ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पुन्हा एकदा संकटात सापडली आहे. सध्या तरी स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी जपान हे सुरक्षित ठिकाण नाही, अशा शब्दांत वैद्यकीय तज्ज्ञांनी इशारा दिला आहे.
ऑलिम्पिक स्पर्धा चार महिन्यांवर आली असताना संयोजन समितीने सुरक्षा नियम आणखी कठोर केल्याचा दावा केला आहे. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिकचे आयोजन न करणेच योग्य ठरेल. जपानमधील परिस्थितीत धोकादायक आहे. देशात लसीकरण सुरू असले तरीही त्याचा वेग अत्यंत कमी आहे. स्पर्धेपूर्वी सर्व लसीकरण पूर्ण होणार नाही. अशा स्थितीत ही स्पर्धा आयोजित करणे धोक्याचे ठरेल, असे मतही देशातील वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
ऑलिम्पिचे सुरक्षित आयोजन करण्यासाठी देशातील लसीकरणाचे प्रमाण 60 ते 70 टक्के असणे आवश्यक आहे. परंतु सध्या तरी देशात चालू असलेल्या लसीकरणाचा वेग पाहता स्पर्धेपूर्वी लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण होणार नाही, मग अशा स्थितीत ही स्पर्धा आणखी धोका उत्पन्न करेल, असा इशाराही या तज्ज्ञांनी दिला आहे.
ऑलिम्पिक व पॅरालिम्पिकसाठी येणाऱ्या जवळपास 15 हजार खेळाडूंना तसेच सपोर्ट स्टाफच्या सदस्यांना जपानमध्ये प्रवेश करताना लस दिली जाणार आहे, असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) स्पष्ट केले आहे. तसेच देशाच्या नागरिकांचेही सध्या लसीकरण सुरू आहे. मात्र, ही स्पर्धा करोनाच्या सावटाखाली खेळवण्याचा अट्टहास देशाला महागात पडू शकतो, असा इशाराही या तज्ज्ञांनी दिला आहे.
सध्या जपानमधील लसीकरणाचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या एक टक्का असून, यात वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर 23 जुलैला ऑलिम्पिक पूर्वी देशातील नागरिकांचे लसीकरण होणे कठीण असल्याने या स्पर्धेलाही धोका निर्माण होऊ शकतो, असेही सांगितले जात आहे.