शह-काटशहाचे राजकारण : मोबदला देण्याचा ठराव
पिंपरी -“स्थायी’ची भोसरी विधानसभा गटाकडे गेल्यापासून सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत कुरघोड्यांना उधाण आले आहे. जुने ठराव बदलायचे किंवा रद्द करण्याचे सत्र सुरु झाले असून यामुळे शह-काटशहाच्या राजकारणाबाबत चर्चा जोर धरु लागल्या आहेत. शहरातील विविध जागा किंवा रस्ते महापालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी खासगी वाटाघाटीने 17 मालमत्ताधारकांना 16 कोटी 80 लाख रुपये मोबदला देण्याचा ठराव मागच्या स्थायी समितीमध्ये आयत्यावेळी मंजूर केला होता. हा ठराव नवनिर्वाचित स्थायीच्या अध्यक्षांनी आपल्या पहिल्याच सभेत रद्द केला.
तत्कालीन स्थायी अध्यक्ष विलास मडेगिरी यांच्या अध्यक्षतेखाली खासगी वाटाघाटीने 17 मालमत्ताधारकांना 16 कोटी 80 लाख रुपये मोबदला देण्याचा ठराव आयत्यावेळी मंजूर करण्यात आला होता.हा ठराव स्थायीचे नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी त्यांच्या पहिल्याच सभेमध्ये रद्द केला आहे. त्यावरून पुन्हा एकदा स्थायीमध्ये शह काटशहाच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे.
स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भोसरीचे संतोष लोंढे यांची निवड झाली आहे. त्यांची पहिली सभा बुधवारी (दि. 11) पार पडली. महापालिका क्षेत्रातील विविध ठिकाणच्या रस्त्याने किंवा आरक्षणांने बाधित जागा महापालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी ऑगस्ट 2019 मध्ये बैठक झाली. या सभेत संबंधित मालमत्ताधारकांसोबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार खासगी वाटाघाटी समितीने मुंजूर विकास योजनेतील रस्ते आणि आरक्षणाने बाधित क्षेत्राचा मोबदला संबंधित मालमत्ताधारकास देण्यास मंजुरी दिली.
त्यानुसार, गेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये 17 मालमत्ताधारकांना 16 कोटी 80 लाख रुपये मोबदला देण्याचा ठराव मावळते अध्यक्ष विलास मडेगिरी यांनी मंजूर केला. त्यानंतर मडेगिरी यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला. स्थायी समितीवर नवीन आठ सदस्यांची निवड करण्यात आली. तसेच अध्यक्षपदी भोसरीचे संतोष लोंढे यांची निवड करण्यात आली. लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्या सभेत आरक्षणाने बाधित खासगी वाटाघाटीने मालमत्ताधारकांना मोबदला देण्याचा विषय रद्द करण्यात आला.