पिंपरी -“करोना’चा प्रादुर्भाव वाढल्याने मंदिरांमध्येही गर्दी कमी झाली आहे. गुुरुवारी संकष्ट चतुर्थीनिमित्त चिंचवडगावातील महासाधू श्री मोरया गोसावी मंदिरात भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. परंतू करोनाच्या धास्तीमुळे मंदिरात भाविकांची गर्दी कमी झाल्याचे चित्र पहायला मिळाले.
चतुर्थी निमित्त मंदिरात पहाटे महापूजा व अभिषेक घालण्यात आला. यानंतर भाविकांना मंदीर दर्शऩासाठी खुले करण्यात आले. संकष्ट चतुर्थी असूनही करोनाच्या धास्तीमुळे भाविकांनी घरी बसूनच गणपतीची पूजा करणे पसंत केले. इतर दिवसांच्या तुलनेत गुरुवारी मंदिरात भाविकांची कमी गर्दी पहायला मिळाली.
दर संकष्टीला चतुर्थीनिमित्त भरणाऱ्या यात्रेत खरेदीसाठी भाविकांचा वेगळा उत्साह असतो. मात्र गुरुवारी तिथीनुसार आलेली शिवजयंती आणि “करोना’ व्हायरसबाबत खबरदारीचा उपाय म्हणून मंदिर परीसरात महापालिकेच्या वतीने विक्रेत्यांना बसू देण्यात आले नाही.
त्यामुळे वस्तू खरेदीसाठी येणाऱ्या भाविकांचा हिरमोड झाला. तसेच “करोना’च्या धास्तीने बाहेरगावाहून भाविकांनी दर्शनासाठी येणे टाळल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यामुळे मंदिर परीसरात शुकशुकाट दिसून आला.