करोनाचे रुग्ण आढळलेल्या तीन किलोमीटरच्या परिसरातील नागरिकांचे सर्वेक्षण
पुणे – करोनाचे रुग्ण आढळलेल्या तीन किलोमीटरच्या परिसरातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत 8 हजार 777 घरांमधील 3 हजार 87 नागरिकांची तपासणी केली असून यामध्ये कोणत्याही नागरिकांमध्ये करोनाची लक्षणे आढळून आलेली नाहीत. दरम्यान, 216 लोकांचे तपासणीचे नमुने एनआयव्हीच्या प्रयोगशाळेमध्ये पाठवले होते. यामध्ये 191 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अजून 15 व्यक्तींचा अहवाल येणे बाकी आहे, असे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
करोनाचे रुग्ण आढळलेल्या ठिकाणांचे जीपीएस लोकेशन तयार केले आहे. झोन निश्चित केला असून याठिकाणी मदत पुरविण्यात येणार आहे. यासाठी आराखडा तयार केला असून त्यानुसार कामे सुरू आहेत. दरम्यान, रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांची जेवणाची व्यवस्था करण्याच्या सूचना महानगरपालिकेला दिल्या आहेत. या रुग्णांना डायट जेवण पाहिजे असेल तर ते सुद्धा देण्यात येईल.
आकडेवारी
700 प्रवासी तपासले
311 प्रवासी निरीक्षणाखाली असून त्यांचा पाठपुरावा सुरू आहे
235 आंतररुग्ण होते
211 जणांना घरी सोडण्यात आले
24 जण रुग्णालयात असून त्यांची प्रकृती स्थिर
“त्या’ नागरिकांना घरी राहण्याच्या सूचना
जिल्हा प्रशासनाने टूर ऑपरेटर कंपन्यांकडून मागील एक महिन्यांपूर्वी परदेशी सहलीला गेलेल्या प्रवाशांची माहिती मागितली होती. या माहितीनुसार 170 नागरिकांनी परदेश सहल केली असून या नागरिकांना घरी राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्हा प्रशासनाने विलगीकरण कक्षांची संख्या वाढविली
जिल्हा प्रशासनाने विलगीकरण कक्षांची संख्या वाढविली आहे. पुणे शहरात 370 बेड आणि पिंपरी- चिंचवड शहरात 140 बेड तयार केले आहेत.
“दुबईतून आलेल्या 129 प्रवाशांना लागण नाही’
दुबईतून 129 प्रवासी विमानाद्वारे शुक्रवारी पहाटे लोहगाव विमानतळावर आले. यामध्ये 74 पुरुष, 41 महिला आणि 14 लहान मुलांचा समावेश आहे. यामध्ये 118 भारतीय तर, 11 परदेशी नागरिक आहेत. या सर्वांची वैद्यकीय तपासणी झाली आहे. यात करोना संशयित रुग्ण कोणीही आढळून आलेले नसल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले. 15 फेब्रुवारी 2020 नंतर ते आजमितीपर्यंत चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या देशांतून प्रवास करून आलेले कोणीही नाहीत. दरम्यान, दुबईतून आलेले दोन भारतीय नागरिकांपैकी एक महिला (वय-26) आणि त्यांचे लहान बाळ (वय -1) यांनी स्वतःहून कफ असल्याचे सांगितल्याने त्यांना नायडू हॉस्पिटल येथे पाठवले आहे. उर्वरित सर्व प्रवासी यांना आपले स्वतःच्या घरीच राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुणे जिल्हा प्रशासन, पुणे विमानतळ व्यवस्थापन, वैद्यकीय पथक आणि पोलीस प्रशासन यांच्या मदतीने कार्यवाही पूर्ण केली आहे.
प्रवाशांच्या स्क्रीनिंगसाठी पथक
जगभरात महामारी (पॅंडेमिक) म्हणून घोषित केलेल्या करोना विषाणूच्या उद्रेक झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे येथील ससून सर्वोपचार रुग्णालय या संस्थेतर्फे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे रात्रीच्यावेळी प्रवाशांच्या तपासणीसाठी (स्क्रीनिंग) डॉक्टर आणि परिचारिकांच्या पथकांची नियुक्ती केली आहे. पुणे महानगरपालिकेच्या नायडू रुग्णालयामध्येदेखील डॉक्टरांचे पथक नियुक्त केले असून त्यांच्यातर्फे नियमित तपासणी व उपचार सुरू आहेत. तसेच, यासाठी मेडिसिन, अनास्थेशिया व पल्मनरी मेडिसीन या विभागांचे प्राध्यापक व विभागप्रमुख हे नायडू रुग्णालयामध्ये जाऊन करोना विषाणूग्रस्त रुग्णांची नियमितपणे पाहणी करतात व उपचारासाठी मार्गदर्शन करतात, अशी माहिती बै. जी. शासकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली.
नायडू रुग्णालयात अखेर आयसीयू सुरू
करोनाचे वाढते रूग्ण लक्षात घेऊन महापालिकेने अखेर डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात दोन बेडचे आयसीयू सुरू केले आहे. नायडू सांसर्गिक रुग्णालयात अतिदक्षता विभागात लवकरच सुरू करणार अशी घोषणा महापौर मोहोळ यांनी गेल्याच आठवड्यात केली होती. त्यावर तातडीने पावले उचलत अतिदक्षता विभागाचे 2 बेड्स सुरू करण्यात येत आहेत. सांसर्गिक रोगांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना यामुळे दिलासा मिळाला असून यामुळे खासगी रुग्णालयात उपचारांसाठी जाण्याची गरज पडणार नाही. मोहोळ म्हणाले, डॉ. नायडू सांसर्गिक रोगांच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागाची अत्यंत तातडीची गरज होती. त्याच अनुषंगाने महापौर निधीच्या माध्यमातून यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी दिला जात आहे. नियमातील तरतूदीनुसार प्रक्रिया करून तातडीने अतिदक्षता विभाग केले जात आहेत. तातडीच्या स्वरुपात हा विभाग सुरू व्हावा, यासाठी आम्ही ससून रुग्णालयाची मदत घेतली आहे. करोनाच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येचा विचार करता 2 बेड्स लगेचच उपलब्ध झाले आहेत.