पंतप्रधानांच्या ‘मन कि बात’ला डिसलाईक करणाऱ्यांचीच संख्या जास्त

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदी हे आकाशवाणीवरून संवाद साधतात. हा कार्यक्रम यू ट्यूबरही प्रसारित केला जातो. मात्र एवढ्या वर्षांमध्ये पंतप्रधानांचा मन कि बात हा कार्यक्रम यावेळी वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. मोदींच्या ‘मन की बात’च्या यू ट्यूबवरील व्हिडीओला लाईकपेक्षा जास्त डिसलाईक करण्यात आल्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा व्हिडीओ मोदी यांच्या नावे असलेल्या यू ट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आलेला आहे. हा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर लाईकपेक्षा डिसलाईक करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे दिसून आले.

देशात सध्या करोनामुळे परीक्षा घेण्यावरून दोन गट पडले आहेत. जेईई व नीट परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार आहेत. देशातील करोना स्थितीचा विचार करता, या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होताना दिसत आहे. ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदी यांनी या परीक्षेसंदर्भात कोणतेही भाष्य न केल्याने नाराजी व्यक्त झाल्याचे दिसत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.