इस्लामाबाद: पाकिस्तानात वेगाने करोनाचा फैलाव होत आहे. त्या देशातील करोनाबाधितांच्या संख्येने गुरूवारी 10 हजारांचा टप्पा ओलांडला. जगभरात कहर केलेल्या विषाणूने आतापर्यंत पाकिस्तानात 228 रूग्णांचा बळी घेतला आहे.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांताला करोनाने सर्वांधिक विळखा घातला आहे. त्या प्रांतात 4 हजार 500 हून अधिक करोनाबाधित आढळले आहेत. त्याखालोखाल सिंध प्रांतातील करोनाबाधितांची संख्या 3 हजारांवर पोहचली आहे. करोना संकटामुळे आधीपासूनच डबघाईला आलेल्या पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला आणखी हादरा बसला आहे. त्यातून करोना संकटावर मात करण्यासाठी पाकिस्तानला इतर देशांपुढे आणि जागतिक संस्थांपुढे आर्थिक मदतीसाठी हात पसरावे लागत आहेत.
पाकिस्तानची आरोग्य यंत्रणा अतिशय कमी दर्जाची मानली जाते. त्यामुळे करोना फैलाव रोखताना तो देश घायकुतीला आल्याचे चित्र आहे. तशाही स्थितीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना वैयक्तिक पातळीवर मोठाच दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी इम्रान यांची भेट घेणाऱ्या व्यक्तीला करोनाची बाधा झाली. त्यामुळे इम्रान यांनी स्वत:ची करोनाविषयक चाचणी करून घेतली. त्या चाचणीतून त्यांना करोनासंसर्ग नसल्याचे स्पष्ट झाले.