देशातील करोनाबाधितांची संख्या 3 कोटींवर

नवी दिल्ली  -संपूर्ण जगाला ग्रासलेल्या करोना संकटाशी झुंजत असणाऱ्या भारताने बुधवारी नकोसा टप्पा ओलांडला. देशातील करोनाबाधितांची संख्या आता 3 कोटींवर गेली आहे.

देशात मंगळवार सकाळपासून 24 तासांत 50 हजार 848 नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे देशातील बाधितांची एकूण संख्या 3 कोटी 28 हजार 709 इतकी झाली आहे. मागील वर्षी 19 डिसेंबरला देशातील बाधित संख्येने 1 कोटीचा टप्पा ओलांडला.

त्यानंतर 136 दिवसांनी म्हणजे 4 मे यादिवशी ती संख्या 2 कोटींवर गेली. त्यामध्ये आणखी 1 कोटीची भर अवघ्या 50 दिवसांत पडली. अर्थात, मागील काही दिवसांपासून नव्या बाधितांच्या संख्येत आणि मृत्यूच्या प्रमाणात लक्षणीय घट होत असल्याने देशाला दिलासा मिळाला आहे.

संबंधित 24 तासांत देशभरात आणखी 1 हजार 358 बाधित दगावले. त्यामुळे देशातील करोनामृतांची संख्या 3 लाख 90 हजार 660 इतकी झाली आहे. देशातील सक्रिय बाधितांची संख्या घटून 6 लाख 43 हजार 194 वर पोहचली आहे. ते प्रमाण एकूण बाधितांच्या 2.14 टक्के इतके आहे. बाधित बरे होण्याचे प्रमाण वाढून 96.56 टक्के नोंदले गेले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.