पुणे/मुंबई, – मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा इ मेल गृहमंत्रालयाला पाठवणाऱ्या पुण्यातील होटेल व्यावसायिकास अटक करण्यात आली. त्यांची जुळी मुले नववीत अनुत्तीर्ण झाल्याने त्यांनी हे कृत्य केल्याचे सामगण्यात येत आहे.
शैलेश शिंदे (वय 53) हे घोरपडी भागात हॉटेल चालवतात. त्यांनी हे कृत्य केल्याचा तपासात समोर आले. नागपूरमधील सागर मांढरे या तरूणाने महिन्यापुर्वी मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा इ-मेल पाठवला होता.
हा इ मेल मिळाल्यानंतर मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी मरिन ड्राइव्ह पोलिसांना कळवले होते. त्यानंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने मंत्रालयाची कसून पाहणी केली. मात्र त्यांना काहीही आढळले नाही. त्यानंतर पोलिसांनी आयपी ऍड्रेस चेक केला.
त्यावेळी तो शिंदे यांच्या फोनचा असल्याचे आढळले. हा फोन पुण्यात असल्याचे स्पष्ट झाले. मुंबई पोलिसांनी मुंढवा पोलिसांना याची तातडीने कल्पना दिल्यानंतर शिंदे यांना सोमवारी अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला मुंबई पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
गेल्या वर्षी आपली जुळी मुले इयत्ता नववीच्या परीक्षेत नापास झाली. त्याची चौकशी करण्यासाठी आपण अर्ज केला. मात्र चौकशी पथकाने घेतलेल्या तपसणीतही त्यांना अनुत्तीर्ण ठेवण्यात आले.
त्यामुळे त्याविरोधात त्यांनी शिक्षण विभागाला अनेक इ मेल्स केले मात्र त्याची दखल न घेतल्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्याच्यावर भारतीय दंडसंहितेच्या कलम 506(2), 501 (1) (ब), आणि 182 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.