पिंपरी – एका कुटूंबाने गाडी खरेदी करून घरी आणली. तिची पूजाही केली. मात्र खरेदी केलेली नवीन गाडी अवघ्या 12 तासांत चोरीला गेली. सागर दिलीप काटे (वय 36, रा. मुंजोबा चौक, पिंपळे सौदागर) यांनी बुधवारी (दि. 7) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
एका नामांकित कंपनीत काम करणारे शिवाजी गायकवाड (रा. पार्वती कॉम्प्लेक्स, चिंचेचा मळा, चिखली) यांनी नवीन दुचाकी घेण्याचे स्वप्न उराशी बाळगले. मात्र आपल्याला दुचाकी चालवता येत नसल्याने त्यांचा हा विचार मनातच राहिला. मात्र त्यांच्या मित्राने त्यांना दुचाकी शिकविण्याची जबाबदारी घेतली. यामुळे गायकवाड यांनी तब्बल 81 हजार रुपये खर्च करून (एमएच 14 जेक्यू 8047) ही दुचाकी सोमवारी (दि. 5) खरेदी केली. त्यासाठी गायकवाड यांनी 60 हजार रुपयांचे कर्जही काढले. गायकवाड यांना दुचाकी चालविता येत नसल्याने त्यांनी त्यांचा मित्र सागर काटे यांना शोरूममधून दुचाकी आणण्याची विनंती केली. त्यानुसार काटे यांनी नवीन दुचाकी आणून गायकवाड राहत असलेल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये ठेवली. गायकवाड कुटुंबीयांनीही मनोभावे दुचाकीची पूजा केली. उपस्थित असलेल्या सर्वांना पेढेही वाटले. नवीन वाहन घरी आल्याने गायकवाड कुटुंबीय आनंदी होते. त्यांची दुचाकी लॉक करून ठेवली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास गायकवाड हे गाडी पाहण्यासाठी पार्किंगमध्ये आले. त्यावेळी दुचाकी चोरीला गेल्याचे दिसून आले.