भोपाळ – केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे मोदी सरकारमध्ये सामील झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचे फेसबुक अकाऊंट हॅक केले जाण्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे तसे करताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच त्यावरून लक्ष्य करण्यात आल्याने खळबळ उडाली. झाला प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीने हा प्रकार थांबवण्यात आला असून आता तपास केला जातो आहे.
कालच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर रात्री 12.23 वाजता त्यांच्या फेसबुक वॉलवर पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातील आक्रमक भाषण केलेला जुना व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. शिंदे हे जेव्हा कॉंग्रेसमध्ये होते, त्यावेळी त्यांनी मोदी सरकारविरोधात केलेल्या आक्रमक भाषणाचा हा व्हिडिओ होता. हा प्रकार निदर्शनास आल्यावर तातडीने सायबर तज्ज्ञांनी यात लक्ष घालत हॅकिंगचा हा प्रकार थांबवला. तेथे अपलोड करण्यात आलेले साहित्यही हटवण्यात आले आहे.
2020 मार्चमध्ये शिंदेंनी कॉंग्रेसला रामराम ठोकला आणि भाजपमध्ये प्रवेश केला होता. राज्यसभेचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात शपथ घेतली. त्यांच्यावर सिव्हील एव्हिएशनची जबाबदारी देण्यात आली आहे.