पिंपरी, दि. 16 – हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या दोन ग्राहकांनी मटणाच्या सूपमध्ये भात आल्याने वेटरचा खून केला. तसेच अन्य दोघांना मारहाण करून जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. 16) मध्यरात्री पावणे एक वाजता पिंपळे सौदागर येथील सासरवाडी हॉटेलमध्ये घडली.
मंगेश संजय पोस्ते (वय 19, रा. पिंपळे सौदागर) असे खून झालेल्या वेटरचे नाव आहे. याप्रकरणी विशाल महादू रजाळे (वय 21, रा. पिंपळे सौदागर. मूळ रा. जालना) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विजयराज वाघिरे आणि त्याच्या साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत अजित अमृत मुटकुळे (वय 32), सचिन सुभाष भवर (वय 22, दोघे रा. बनकरवस्ती, मोशी) हे दोघेजण जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित मुटकुळे यांचे पिंपळे सौदागर येथे सासरवाडी नावाचे हॉटेल आहे. हॉटेलमध्ये बुधवारी मध्यरात्री आरोपी जेवण करण्यासाठी आले होते. त्यांनी मागवलेल्या मटणाच्या सूपमध्ये भात पडल्याने हॉटेलमधील सर्व्हिस चांगली नाही, असे म्हणून त्यांनी शिवीगाळ व दमदाटी केली. वाघिरे याच्या साथीदाराने अजित मुटकुळे आणि सचिन भवर यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर मंगेश पोस्ते याच्या डोक्यात लाकडी दांडके मारुन त्याचा खून केला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.