पुणे, दि. 26 -शहराच्या मध्यवस्तीत भिडे पुलाजवळ तरुणावर शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना सोमवारी (दि. 26) दुपारी उघडकीस आली. खुनामागचे कारण समजू शकले नाही.
गणेश सुरेश कदम (रा. अमृतेश्वर मंदिराजवळ, शनिवार पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे. बाबा भिडे पुलाजवळ मोकळ्या जागेत सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कदम गंभीर जखमी अवस्थेत सापडला. त्याच्या गळ्यावर शस्त्राने वार करण्यात आले होते. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
कदम याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. कदम शनिवार पेठेत राहायला होता. त्याच्या खुनामागचे कारण समजू शकले नाही. जुन्या वादातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पसार झालेल्या हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. गणेशचा भाऊ ओम याचा काही वर्षांपूर्वी शनिवार पेठेत खून झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, ही माहिती सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली. त्यामुळे नागरिकांनी झेड ब्रिज आणि लकडी पुलावर गर्दी केली होती.