नगर -नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेच्या निवडणुकीवरील स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सोमवारी उठविली. त्यामुळे आता बॅंकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. दि. 16 ऑक्टोबर रोजी मतदान तर 17 ऑक्टोबर रोजी मतमोजणी घेण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत.
शिक्षक बॅंक व विकास मंडळाची निवडणूक 24 जुलै रोजी होणार होती. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. माघारीची मुदतही संपुष्टात येऊन उमेदवारांना चिन्ह वाटपही करण्यात आले होते. उमेदवारांनी प्रचार सुरू केला आणि राज्य सरकारने परिपत्रक काढून अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर अखेरपर्यंत आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या होत्या. सरकारच्या या निर्णयाला हरकत घेत बॅंकेच्या निवडणुकीत उतरलेल्या काही उमेदवारांनी व शिक्षक सभासदांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या.
या याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्यात आली. सोमवारी सकाळच्या सत्रात न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती अर्जुन पेडणेकर यांच्या समोर सुनावणी झाली.
यावेळी खंडपीठाने याचिकाकर्त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने निवडणूक ज्या टप्प्यावर स्थगित करण्यात आली होती त्याच टप्प्यावर पुन्हा सुरू करून मतदान प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले. दरम्यान, विरोधी गटाने शिक्षक बॅंकेची निवडणूक प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरू करावी. दरम्यानच्या काळात जे नवीन सभासद झाले आहेत त्या सभासदांना मतदानाचा, उमेदवारीचा हक्क मिळावा, अशी मागणी केली. तसेच सत्ताधारी मंडळाने सभासदांना यावर्षाचा लाभांश वाटला व सभासदांना प्रलोभन दाखवले परंतु, न्यायालयाने लाभांश हा सभासदांचा हक्क आहे. सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार सभासदांना देणे गरजेचे होते, यात चुकीचे काही नाही. न्यायालयाने विरोधकांचा हा आक्षेप फेटाळून लावला.