लोणंद (प्रतिनिधी) – काळज (ता. फलटण) येथील दहा महिन्यांच्या चिमुकल्याचं अपहरण करून खून केल्याच्या प्रकरणाचे गूढ उलगडले आहे. एकतर्फी प्रेमातून ही निर्घुण घटना घडल्याचे स्पष्ट झाले असून संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ओम भगत याचे मंगळवारी अपहरण झाले होते. दहा महिन्यांच्या या चिमुकल्याचा मृतदेह गुरुवारी घराशेजारील विहिरीत आढळला होता. लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. हा संपूर्ण प्रकार एकतर्फी प्रेमातून केल्याचं समोर चौकशीदरम्यान स्पष्ट झाले. पोलिसांनी संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत.
ओमच्या आईवर एका तरुणाचं एकतर्फी प्रेम होतं. मात्र ओमची आई त्याला कोणताच प्रतिसाद देत नव्हती. भेटणं बोलणंही टाळत होती. त्यामुळे रागातून या तरुणानं ओमचं अपहरण केलं आणि दोन दिवसांनी त्याची हत्या केली, अशी प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली.
दरम्यान, याप्रकरणी माहिती देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दुपारी चार वाजता साताऱ्यात पत्रकार परिषद आयोजित केली आहे.