पुणे – पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने खेड-शिवापूर येथील 5 एकर जागेवर आधुनिक बाजार उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 24 कोटी 73 लाख रुपये खर्च येणार आहे. या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रखडलेल्या 67 कोटी रुपयांच्या निविदांना मंजुरी देण्यात आली आहे. गेली 15 वर्षांपासून प्रलंबित राहिलेली कामे मार्गी लावण्यासाठी पणन मंडळाने कंबर कसली आहे. 2003-04पासून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवरदेखील प्रशासक, प्रशासकीय मंडळ कार्यरत आहे. या काळात समितीचे उत्पन्न व ठेवीदेखील वाढल्या आहेत. पुणे बाजार समिती मुख्य बाजार आवाराला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन बदलण्यासाठी 4 कोटी 35 लाख रुपये, पुणे उपबाजार उत्तमनगर येथील विकास आराखड्यासाठी 37 कोटी 99 लाख रुपये अशा खर्चाच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत.