वाई – पालिकेच्या विषय समितीच्या निवडीसाठी सोमवारी झालेल्या सभेत पाच समित्यांपैकी स्वच्छताविषयक वैद्यकीय व आरोग्य समिती आणि पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती या दोनच समित्या गठित झाल्या. अन्य तीन समित्या गठित होऊ शकल्या नाहीत. यावेळी पीठासन अधिकाऱ्यांनी अर्ज फेटाळून लावल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत अपक्षांनी सभात्याग करून निषेध नोंदविला. या निर्णयाविरूध्द विभागीय आयुक्तांकडे अपिल दाखल करण्याचा निर्णय अपक्षांनी घेतला.
या निवडीत भाजपच्या रुपाली वनारसे व सुमैय्या इनामदार यांची अनुक्रमे आरोग्य व पाणी पुरवठा समितीच्या सभापतीपदी तर स्थायी समितीत सुनीता चक्के यांची वर्णी लागली. त्यामुळे पालिकेवर भाजपप्रणित वाई विकास महाआघाडीचे वर्चस्व प्रस्थापित झाले. पालिकेतील विविध विषय समितीच्या सभापती व सदस्यांच्या निवडीसाठी आज पीठासन अधिकारी जिल्हा प्रशासन अधिकारी रवी पवार यांच्या उपस्थितीत विशेष सभा पार पडली. बैठकीस पालिकेचे सर्व पदाधिकारी, सदस्य व मुख्याधिकारी विद्या पोळ उपस्थित होत्या. प्रारंभी पीठासन अधिकाऱ्यांनी सदस्यांना नियमातील तरतूदींची माहिती दिली.
नगराध्यक्षांसह भाजपप्रणित वाई विकास महाआघाडीचे सहा सदस्य असून तीर्थक्षेत्र विकास आघाडी नोंदणीकृत नसल्याने राष्ट्रवादीचे तीर्थक्षेत्र आघाडीच्या माध्यमातून निवडून आलेले उपाध्यक्षांसह सदस्य अपक्ष आहेत. प्रत्येक विषय समितीच्या सदस्यांच्या निवडीसाठी वाई विकास महाआघाडीच्या सदस्यांसह अपक्षांनी अर्ज दाखल केले. मात्र पीठासन अधिकाऱ्यांनी कायद्यातील तरतूद व नियमाचा दाखला देत इतर सदस्य अपक्ष असल्याचे कारण देऊन त्यांचे अर्ज फेटाळले. त्यामुळे पाचपैकी स्वच्छता विषयक, वैद्यकीय व आरोग्य विषयक समिती व पाणी पुरवठा व जलनिःसारण समिती या दोन समित्यांमध्ये वाई महाविकास आघाडीच्या तीन सदस्यांची निवड झाली.
त्यानंतर त्यापैकी एकाची सभापतीपदी निवड करण्यात आली. यामध्ये स्वच्छता विषयक, वैद्यकीय व आरोग्य विषयक समिती सभापती रुपाली वनारसे, सदस्य सतीश वैराट, वासंती ढेकाणे यांचा समावेश असून दोन पदे रिक्त राहिली. पाणी पुरवठा व जलनिःसारण समितीच्या सभापतीपदी सुमैय्या अमजद इनामदार व सदस्य महेंद्र धनवे, सुनीता चक्के यांचा समावेश असून दोन पदे रिक्त राहिली. स्थायी समितीच्या पदसिध्द सभापतीपदी नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, नियोजन व विकास समितीचे पदसिध्द सभापती उपाध्यक्ष अनिल सावंत यांच्यासह सभापती सुमैय्या इनामदार व सभापती रुपाली वनारसे तसेच नामनिर्देशित सदस्य म्हणून सुनीता चक्के यांचा समावेश असून दोन सदस्य रिक्त राहिले.
यावेळी नियोजन व विकास समिती, शिक्षण समिती आणि महिला व बालकल्याण समिती गठीत झाली नाही. दरम्यान, पीठासन अधिकाऱ्यांनी नामनिदर्शेन पत्र अवैध ठरविल्याने उपाध्यक्षांसह अपक्ष सदस्यांनी या निर्णयाविरूध्द विभागीय आयुक्ताकडे अपिल करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
पेढे वाटून आनंद व्यक्त…
भाजपप्रणित वाई विकास महाआघाडीचे पालिकेतील विषय समित्यांवर निर्विवाद वर्चस्व स्थापन झाल्याने भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर आणि माजी आमदार मदन भोसले यांनी सभापती व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पेढे वाटून व फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.