नगर – फेज टू आणि अमृत पाणी योजना पूर्ण होऊन त्या नवीन योजनेतून नगरकरांना पाणीपुरवठा सुरू झाला आहे. अर्थात जुन्या पाण्याच्या टाकीतून जरी हा पाणीपुरवठा होत असला तरी लवकरच नव्या पाण्याच्या टाकीतून हा पाणीपुरवठा महापालिकेला सुरू करावा लागणार आहे. त्यापूर्वी नगरकरांना नळाद्वारे येणाऱ्या पाण्याची मोजमाप करण्यासाठी मीटर बसविण्यात येणार आहे. त्या दृष्टीने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
नगरकरांना दरवर्षी पाणीपट्टी ही दीड हजार रूपये प्रमाणे भरावी लागते. परंतू आता जेवढे पाणी वापराल तेवढीच पाणीपट्टी भरावी लागणार आहे. नळांना मीटर बसविण्यात येणार असून त्यामुळे मोजूनमापूनच पाणी वापरावे लागणार आहे. पाणीपुरवठा विभागाने शहरातील 80 हजार घरांमधील नळांना मीटर बसविण्याचे नियोजन केले आहे. अमृत पाणीयोजना पूर्ण झाल्याने आता अमृत -2 या योजनेंतर्गत मीटर बसविण्यात येणार आहे.
केंद्र शासनाची 140 कोटी रुपयांची अमृत पाणीयोजना पूर्ण आली आहे. मुळा धरण ते वसंत टेकडीपर्यंतची ही पाण्याची सुधारित पाईपलाईन पूर्ण झाली आहे. नुकतेच चाचणी देखील यशस्वी झाली आहे. या योजनेचे पाणी वसंत टेकडी येथील पिण्याच्या टाकीत पडले. अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी त्याची पाहणीदेखील केली.
अमृत योजनेमुळे नगरकरांना पूर्ण वेळ आणि पूर्ण दाबाने पाणी मिळणार, असा दावा प्रशासन करत आहे. त्याचबरोबर, नगरकरांना यापुढे मोजूनमापूनच पाणी देण्याचे नियोजनदेखील प्रशासन करत आहे. त्यासाठी केंद्राच्या अमृत-2 योजनेंतर्गत तब्बल 800 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
या नवीन योजनेंतर्गत नगरमधील 80 हजार घरांमधील नळांना मीटर बसविली जाणार आहेत.हा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे पाठविला जाणार आहे. सध्या नगरकर घरगुती नळजोडणीसाठी दर वर्षी दीड हजार रुपये पाणीपट्टी महापालिकेला देतात. मात्र मीटर बसविल्यानंतर पाण्याच्या वापरावर पाणीपट्टीचे बिल येणार आहे.
अनधिकृत नळ कनेक्शन होणार अधिकृत
शहरात 1 लाख 20 हजार मालमत्ताधारक आहे. त्यापैकी अधिकृत नळजोड केवळ 52 हजार असल्याचे सांगण्यात आले आहे. आता मीटर बसविण्यात येणार असल्याने अनधिकृत नळ कनेक्शनधारक अडचणीत आले असून त्यांना नवीन पाणी कनेक्शन अधिकृत करून मीटर बसवावे लागणार आहे. त्यामुळे महापालिकेने 80 हजार घरांचे उद्दिष्ट ठेवले असून या सर्वांना मीटर बसविण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेला पाणीपट्टी वसुलीचे उत्पन्न वाढीला मदत होणार आहे.