उमरखेड – 11 जानेवारी रोजी पुसद रोडवरील साकळे विद्यालय समोर डॉ. हनुमंत धर्मकारे यांची भरदिवसा देशी कट्यातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपीला मध्यप्रदेशातील धार याठिकाणावरून 4 फेब्रुवारी रोजी ताब्यात घेण्यात आले.
या घटनेत सामील चौघांना 14 जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती पण प्रत्येक वेळी मुख्य आरोपी हा पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला होता. घटनेच्या तब्बल 24 दिवसांनंतर त्याला मध्य प्रदेशातील धार येथून स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाने शिताफीने अटक केली.
मुख्य मारेकरी शेख ऐफाज शेख आबरार उर्फ अप्पू (वय 22 वर्षे) याच्या चार साथीदारांना अटक केली होती. त्यामध्ये त्याचा मामा सैयद तौसिफ सैयद खलील (35), सय्यद मुस्ताक शेख खलील (32) या दोघांसह मित्र शेख मोहसीन शेख कयूम (34), शेख शाहरुख शेख कलम (27) (सर्व राहणार ढाणकी) यांचा समावेश होता. मुख्य मारेकरी याच्या अटकेची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी यांचे नेतृत्वातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक देशमुख व त्यांच्या पथकाने केली. पुसद येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात शेख ऐफाज शेख आबरार ला 10 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.