नवी दिल्ली – बऱ्याच सरकारी बॅंकांनी तिसऱ्या तिमाहीचे ताळेबंद जाहीर केले असून या बॅंकांच्या नफ्यात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. स्टेट बॅंकेच्या तिसऱ्या तिमाहीतील नफ्यात 62 टक्क्यांची वाढ होऊन या बॅंकेचा नफा 8,432 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत स्टेट बॅंकेला 5,196 कोटी रुपयांचा नफा झाला होता. या तिमाहीत बॅंकेला खराब कर्जापोटी केवळ 6,974 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली आहे. गेल्या वर्षी बॅंकेला 10,342 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली होती.
दरम्यान बॅंक ऑफ बडोदाने जाहीर केलेल्या ताळेबंद त्यानुसार तिसऱ्या तिमाहीत या बॅंकेला 2,197 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत बॅंकेला 1,061 कोटी रुपयांचा नफा झाला होता. या तिमाहीत बॅंकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता कमी होऊन 7.25 टक्के इतकी झाली आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत बॅंकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता 8.48 टक्के इतकी होती. खराब कर्जापोटी या तिमाहीत बॅंकेला 2,507 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली आहे.