जामखेड – शहरासह तालुक्यात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. आरोळेनगर येथील समता ग्रुपच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुका विशेष आकर्षण ठरल्या. सायंकाळी ५ वाजता निघालेल्या मिरवणुका रात्री ११ वाजेपर्यंत चालू होत्या. रविवारी तापमान ३७ अंशावर गेलेले असताना अनुयायांचा उत्साह दिवसभर कायम होता.
शहरात सिद्धार्थनगर, मिलिंद नगर,सदाफुले वस्ती यासह विविध ठिकाणी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन झाले. इंदिरानगर आरोळे वस्ती येथील येथील समता ग्रुपच्या वतीने पोलीस निरीक्षक महेश पाटील, अरुण जाधव, संध्याताई सोनवणे यासह मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. सायंकाळी वाजत-गाजत मिरवणुका काढण्यात आल्या.
डोक्यावर निळे फेटे व हातात निळे झेंडे घेऊन भीमसैनिक उत्साहात मिरवणुकांत सहभागी झाले. मोठ्या आवाजाच्या ध्वनिक्षेपकावर लावलेल्या भीमगीतांवर कार्यकर्ते नाचत होते, तर महिलांनी लेझीमच्या प्रात्यक्षिकांद्वारे उपस्थितांचे लक्ष वेधले होते.
‘जय भीम’च्या जयघोषात शहर परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकांनी लक्ष वेधले. मिरवणुकीत समता ग्रुपचे अध्यक्ष संतोष गव्हाळे, राहुल जावळे, अभिजित राळेभात, राष्ट्रावादीचे तालुकाध्यक्ष महेश निमोणकर, सूरज डाडर,अशोक लोंढे, राहुल चव्हाण, शाम शिंदे, तानाजी घायतडक, मधुकर पवार, नाना गव्हाळे, कैलास पवार, युवराज डाडर, तन्वीर शेख, कादिर आत्तार, श्रीराम माने, राजू देडे यांनी संयोजन केले.