रांची – झारखंडमधील गुमला जिल्ह्यात अंधश्रद्धेतून महिलेला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना जिल्ह्यातील घाघरा पोलिस स्टेशन अंतर्गत गमहरिया गावात घडली. एक 45 वर्षीय महिलेला चेटकीण असल्याचे म्हणत तिच्या नातेवाईकांनीच बेदम मारहाण केली आहे. एकाने तर महिलेच्या शरिराचे दाताने लचके तोडले आहेत. तसेच महिलेच्या मुलगी आणि पतीलाही मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून फगुवा गोप, बेनी गोप, पवन गोप आणि पंकज गोप यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या दोघी डायन असून त्यांनी संपूर्ण गाव उद्ध्वस्त केल्याचे म्हणत हल्लेखोरांनी हल्ला केला. पीडित महिलेने पोलीस ठाण्यात लेखी तक्रार करून जीव वाचवण्याची विनंती केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेबाबत ग्रामस्थांकडे विचारपूस केली जात आहे. दरम्यान घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
– जादूटोण्याच्या आरोपावरून हल्ला
जादूटोण्याच्या आरोपांवरून मारहाण करण्यात आल्याचे जखमींनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून दोषींना सोडले जाणार नाही, कडक कारवाई केली जाणार आहे. एखाद्या महिलेचा चेटकीण म्हणून खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. लोकांमध्ये जागृतीचा अभाव आहे. गावोगावी जाऊन जनजागृती करण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
– जखमी महिलेवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू
जखमी महिलेवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महिलेने सांगितले, शनिवारी 11 वाजता ती आपल्या मुलीसह कोठारात भात काढण्याचे काम करत होती. यादरम्यान, वरील लोकांनी हातात लाठ्या-काठ्या घेऊन धान्याचे कोठार गाठले आणि त्यांना व त्यांच्या मुलीवर चेटकीण म्हणत हल्ला केला. मारामारीच्या वेळी त्यांनी आरडाओरडा केल्यावर लोक येत असल्याचे पाहून चार हल्लेखोर तेथून पळून माझ्या घरी गेले. घरी माझे पती रामकृष्ण गोपा यांनाही मारहाण केली. या मारहाणीच्या घटनेत महिलेसह मुलगी आणि पती असे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.