मुंबई : आरे कॉलनीमध्ये दोन दिवसांपूर्वी बिबट्या दिसून आला होता. या बिबट्याने आरे कॉलनीत राहणाऱ्या एका वृद्ध महिलेवर झडप घातल्याचे सीसीटीव्हीमधून समोर आल्यानंतर वनविभागाने या बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने कारवाई सुरू केली. या कारवाईला आज पहाट यश आले असून बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आले आहे. आरे कॉलनी आणि आसपासच्या परिसरात एकूण ७ जणांवर बिबट्याने हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे.
आज पहाटे साडेपाचच्या सुमारास हा बिबट्या त्याच्यासाठी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. संध्याकाळी अंधार पडल्यानंतर हा बिबट्या लोकांवर हल्ले करत असल्याचे समोर आले होते. नुकताच बुधवारी या बिबट्याने आरे कॉलनीमध्ये एका ५५ वर्षांच्या वृद्ध महिलेवर हल्ला केला होता. त्यापाठोपाठ गुरुवारी रात्री एका १९ वर्षीय तरुणावर देखील बिबट्याचा हल्ला झाल्याची माहिती मिळाली हती.
आरे कॉलनीत वृद्ध महिलेवर बिबट्याने केलेल्या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही फूटेजमध्ये कैद झाली होती. व्हिडीओत आरे डेअरी परिसरात हा बिबट्या आल्याचं दिसत आहे. यानंतर काही वेळातच तिथे एक वृद्ध महिला चालत येताना दिसते. नीट चालायला जमत नसल्याने महिलेने काठीचा आधार घेतलेला होता. निर्मला देवी सिंग असे या ५५ वर्षीय महिलेचे नाव असून काही वेळाने त्या तिथे पायरीवर बसतात. यावेळी आपल्या मागे बिबट्या बसला आहे याची त्यांना कल्पनाच नव्हती.
काही वेळाने बिबट्या महिलेच्या दिशेने पावले टाकत येतो आणि काही कळण्याआधीच हल्ला करतो. यावेळी महिला हातातल्या काठीने प्रतिकार करण्यास सुरुवात करते. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे खाली जमिनीवर पडलेल्या महिलेवर बिबट्या पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. मात्र महिलेचा प्रतिकार पाहता काही वेळाने तो तिथून पळ काढत असल्याचे सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे.