पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय पद्धतीनेच निवडणुका होणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता महिला आणि जातीय आरक्षणावरून इच्छुकांमध्ये घालमेल सुरू झाली आहे. तीनच्या सदस्यांमुळे कोणत्या प्रभागात दोन महिला आणि कोणत्या प्रभागात दोन पुरुषांसाठी आरक्षण पडणार हा कळीचा मुद्दा बनला आहे.
त्यातच दोन महिला आणि एक जातीय आरक्षण पडल्यास सर्वसाधारण गटातील पुरुषांना यावेळी घरीच बसावे लागणार असल्याने इच्छुकांनी आतापासून देव पाण्यात ठेवण्यास सुरुवात केली आहे.
महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या फेब्रुवारीमध्ये होणार हे जवळपास निश्चित झाल्याने सर्वच पक्षांतील इच्छुकांनी तयारी चालविली आहे. निवडणुकीसाठी आता अवघे चार महिने शिल्लक राहिले आहेत. सुरुवातीला एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीने निवडणुका होण्याच्या शक्यतेने अनेकांनी मैदानात उतरण्याची तयारी केली होती.
मात्र राज्य शासनाने तीन सदस्यीय वॉर्ड पद्धतीने निवडणुका घेण्यावर शिक्कामोर्तब केल्याने इच्छुकांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पन्नास टक्के महिलांचे आरक्षण असल्यामुळे एकाआड एका वॉर्डात आता दोन महिलांसाठीचे आरक्षण असणार आहे. तर पुरुषांसाठीही हीच स्थिती असणार आहे.
58 जागांवर आरक्षण
पन्नास टक्क्यांचे आरक्षण हे सम -विषम वॉर्ड रचनेनुसार होणार की चिठ्ठी काढून आरक्षण टाकले जाणार हे निश्चित नसले तरी दोन्ही बाबीही इच्छुकांच्या हातात नसल्याने आरक्षणाचा विषय सर्वच इच्छुकांसाठी “भगवान भरोसे’ असाच काहीसा बनला आहे. त्यातच 128 सदस्यांच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 23 जागा या अनुसूचित जाती आणि जमातीसाठी आरक्षित असणार आहेत.
त्यामुळे 43 वॉर्डांमधील 23 जागांवर अनुसूचित जाती-जमातीचा एक सदस्य राहणार आहे. दोन महिला आणि एक जातीय आरक्षण निघालेल्या वॉर्डामध्ये सर्वसाधारण गटातील पुरुषासाठी जागाच शिल्लक राहणार नसल्याने त्यांना पाच वर्षे घरीच बसावे लागणार असल्याने सर्वसाधारण गटातील इच्छुक पुरुषांमध्ये सर्वाधिक अस्वस्थतेचे वातावरण पहावयास मिळत आहे.
त्यातच राज्य शासनाने अध्यादेश काढून इतर मागासवर्गीय (ओबीसी) गटासाठीचे आरक्षण निश्चित केल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये या गटासाठी 33 ते 35 जागा आरक्षित होणार आहेत. ओबीसी, जातीय आणि महिला आरक्षणाबाबत निश्चितता नसल्यामुळे अनेकांच्या अडचणी वाढल्या असून तयारी करायची तर कशी? असा प्रश्न अनेकांना भेडसावत आहे.
लोकसंख्या की लॉटरी पद्धत
जातीय आरक्षणासाठी अद्याप निवडणूक आयोगाने निश्चित प्रणाली जाहीर केली नसल्याने यावेळी अनुसूचित जाती-जमातींच्या तीन जागांसाठी लोकसंख्या आधारित आरक्षण राहणार की लॉटरी पद्धतीने आरक्षण जाहीर होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गतवेळी अनुसूचित जाती-जमातींची अधिक संख्या असलेल्या वॉर्डांमध्ये आरक्षण निश्चित केले होते. अधिक लोकसंख्येनंतर उतरत्या क्रमांकाने हे आरक्षण जाहीर करण्यात आले होते. तत्पूर्वी मात्र लॉटरी पद्धतीने वॉर्ड आरक्षित करण्यात आले होते. त्यामुळे येत्या निवडणुकीसाठी आरक्षण कसे असणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
ओबीसीपेक्षा महिला आरक्षणाची धास्ती
सर्वसाधारण गटातील आणि विशेषत: मराठा समाजातील अनेक इच्छुकांनी इतर मागासवर्गीय या घटकातील जातीचा दाखला काढला आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाची यावेळी धास्ती कमी असली तरी महिला आरक्षणाची धास्ती अनेकांनी घेतल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी स्वत:बरोबरच आपल्या सौभाग्यवतींनाही निवडणुकीत उतरविण्याची तयारी चालविली आहे. महिला आरक्षण आले तर सौभाग्यवती आणि नशिबाची साथ मिळून सर्वसाधारण पुरुष आरक्षण पडल्यास स्वत: मैदानात उतरण्याची तयारी अनेकजण करत असल्याचे पाहावयास मिळत आहे.