सिंहगडरस्ता (जयंत जाधव)-सिंहगड रस्त्यावरील प्रमुख परिसर असलेल्या धायरी, अभिरूची परिसरात पहावी तिकडे “गुंतागुंत’ झाल्याचे चित्र आहे. कोणत्याही खांब आणि जमिनीच्या काही फुटांवर सर्वत्र इंटरनेट आणि इतर केबल्सचे अतिक्रमण झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन करतेय तरी काय? असा प्रश्न विचारला जात आहे.
सिंहगड रस्ता भागात मुख्य रस्त्यालगत कोठेही वर पाहिले, तर खांबांवर अनधिकृतपणे इंटरनेट आणि इतर केबलचे अतिक्रमण दिसून येत आहे. त्यामुळे या केबल्स टाकणाऱ्यांवर कोणाचे नियंत्रण नसल्याची स्थिती आहे.
दरम्यान, या प्रकारांबाबत सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय विद्युत विभाग अभियंता एस. जी. जाधव म्हणाले, “हा विषय अतिक्रमण नियंत्रण विभागाचा आहे.’ तर अतिक्रमण नियंत्रण विभाग म्हणतो की “आमच्याकडे केबलचे अतिक्रमण काढण्यासाठी तज्ज्ञ मनुष्यबळ नाही. त्यामुळे हा विषय पथ विभाग, आकाशचिन्ह विभाग यांच्याकडे सुपूर्त करावा.’
अतिक्रमण नियंत्रण विभागाचे जोगळेकर म्हणाले, “मनपा रस्ता खोदण्यासाठी प्रति मीटर 255 रुपये एवढा आकार घेऊन खोदकाम करण्याची परवानगी देते. खड्ड्याची रुंदी 6 इंच आणि खोली 3 फूट असावी. परंतु अशी परवानगी न घेता सर्रास मनपाच्या खांबावर वायरचे अतिक्रमण झाल्याचे दिसत आहे.’
संपूर्ण शहरभर केबलचा विषय ऐरणीवर आला आहे. हवेमध्ये वायर नको म्हणून प्रशासनाने भूमिगत वायरचे काम केले. परंतु हळूहळू या विद्युत खांबांवर, इमारतींवर या केबलचे अतिक्रमण झाल्याचे दिसून येते. ते संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित काढून टाकावेत.
– अतुल कारले, पदाधिकारी, कॉंग्रेस
हवेतील केबलचा अतिक्रमणाचा विषय मार्गी लावण्यासाठी ठोस धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. या बाबतीत मी आयुक्तांशी चर्चा करून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो.
– संजीव ओहोळ, सहायक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय