Raj Thackeray । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि मनसेची आगामीलोकसभा निवडणुकांत युती होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
अशात, माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. या भेटीनंतर राहुल शेवाळे यांनी महायुतीत मनसेचा समावेश करायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे, असे म्हणाले. यावरून पुन्हा एकदा मनसे महायुती सोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
यापूर्वीही मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली मैत्री लपून राहिलेली नाही. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने हे तीन नेते अनेकवेळा एकत्र दिसलेली आहे. त्यामुळे आगामी काळात खरंच मनसेचा महायुतीत समावेश होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.