टोकियो – जपानमध्ये देशवासीयांचा स्पर्धेला असलेला विरोध वाढत आहे. त्यातच देशात करोनाचा धोकाही पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यामुळे काही शहरांतील ऑलिम्पिक ज्योतीची रॅली रद्द करण्यात येईल, असे मत संयोजन समितीच्या अध्यक्षा सेइको हशिमोटो यांनी व्यक्त केले आहे.
ऑलिम्पिक संघटनेच्या काही सदस्यांनी तसेच काही खेळाडूंनीही ऑलिम्पिक ज्योतीच्या रॅलीत सहभागी होण्यास नकार दिला आहे. काही भागांतील करोनाचा धोकाही वाढत आहे. त्यामुळे या रॅलीच्या देशभरातील प्रवासाबाबत आम्हाला लवकरात लवकर निर्णय घ्यावे लागतील. तसेच ज्या शहरांत करोनाचा धोका सर्वात जास्त आहे तेथील रॅली रद्द करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
जपानमध्ये गेल्या वर्षी जेव्हा करोनाचा धोका वाढला त्यावेळी होणारी ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्यात आली होती. आता येत्या 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. अर्थात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना, जपान ऑलिम्पिक संघटना व जपान सरकार हे सातत्याने ही स्पर्धा होणार असे सांगत असले तरीही देशात नागरिकांचा या स्पर्धेला असलेला विरोधही दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच केवळ स्पर्धेलाच नव्हे तर क्रीडा ज्योतीच्या रॅलीलाही विरोध केला जात आहे.