दहा हजारांपेक्षा आधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ

  • महापालिकेकडून नऊ कोटींपेक्षा आधिक रकमेचे वाटप

पिंपरी – महापालिका नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने शहरातील 10 हजारांपेक्षा आधिक विद्यार्थ्यांना 2020-21 या आर्थिक वर्षात शिष्यवृत्ती योजनांचा लाभ दिला आहे. त्यासाठी 9 कोटी 22 लाख 9 हजार रुपये इतका खर्च करण्यात आला आहे, अशी माहिती समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी दिली.

नागरवस्ती विभागाकडून मागासवर्गीय कल्याणकारी, नि:समर्थ अपंग कल्याणकारी आणि इतर कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. दिव्यांग, मुकबधीर, विशेष विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती अंतर्गत 200 जणांना एकूण 48 लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. माता रमाई आंबेडकर आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वाटप योजनेचा 3 हजार विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. त्यासाठी 1 कोटी 80 लाख रुपयांची रक्कम खर्च करण्यात आली. माता रमाई आंबेडकर पाचवी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप योजनेचा 1 हजार 978 विद्यार्थ्यांनी फायदा घेतला. त्यांना शिष्यवृत्ती स्वरुपात एकूण 79 लाख 12 हजार रुपयांची रक्कम देण्यात आली.

दहावीमध्ये 80 ते 90 टक्के आणि 90 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळविणारे विद्यार्थी तसेच बारावीमध्ये 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांना इतर कल्याणकारी योजनेमध्ये शिष्यवृत्ती देण्यात आली. त्याचा 4 हजार 934 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. त्यासाठी एकूण 6 कोटी रुपयांची रक्कम खर्च करण्यात आली. पहिली ते पदव्युत्तरपर्यंत शिक्षण घेणाऱ्या महापालिका हद्दीतील अनाथ, निराधार मुलांना शिष्यवृत्ती देण्यात आली. एकूण 141 विद्यार्थ्यांना 14 लाख 97 हजार रुपयांची रक्कम शिष्यवृत्ती स्वरुपात दिली.

31 विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य
महापालिकेच्या मागासवर्गीय कल्याणकारी योजनेतंर्गत पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर बारावीनंतरच्या उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य या योजनेचा 24 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या विद्यार्थ्यांना एकूण 6 लाख रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवक, युवतींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य योजनेचा फायदा 7 विद्यार्थ्यांनी घेतला. त्यांना एकूण 10 लाख 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले.

एड्‌सबाधितांच्या मदतीसाठी अर्थसहाय्य
एड्‌सबाधित मुलांचा सांभाळ करणाऱ्या पालकांना व संस्थांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ देण्यात आला. 38 जणांनी त्याचा लाभ घेतला. त्यासाठी एकूण 10 लाख 40 हजार रुपये इतकी रक्कम खर्च करण्यात आली. विशेष मुले, व्यक्तींचा सांभाळ करणाऱ्यांना 1 हजार 900 रुपये दरमहा या प्रमाणे अर्थसहाय्य देण्यात आले. एकूण 2 हजार 460 जणांनी त्याचा लाभ घेतला. त्यासाठी एकूण 5 कोटी 99 लाख 77 हजार 500 रुपये इतकी रक्कम खर्च करण्यात आली. शहरातील एड्‌सबाधित व्यक्तींना पीएमपी बस पास मोफत देण्याच्या योजनेचा 207 जणांनी फायदा घेतला. महापालिकेने त्यासाठी 16 लाख 60 हजार 853 रुपये इतकी रक्कम खर्च केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.