प्रयोगशिलतेचा “आविष्कार’ हरपला

नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि प्रायोगिक रंगभूमीसाठी सातत्याने झटणारे अरुण काकडे यांचे नुकतेच निधन झाले. रंगायन फुटून अरविंद देशपांडे आणि सुलभा देशपांडे बाहेर पडले तेव्हा अरुण काकडेच त्यांच्याबरोबर होते. त्यांनी आविष्कार या संस्थेतून अनेक चांगली आणि दर्जेदार नाटके दिली आणि नव्या पिढीतील कलावंतही घडवले. हाडाचे कार्यकर्ते असलेले काकडे स्वतः नवनव्या कलाकारांना ऊर्जा पुरवीत राहिले आणि त्यांच्या कामाला चालना देत राहिले.

गेल्या सहा दशकांपासून रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या अरुण काकडे यांचे निधन मनाला चटका लावून जाणारे आहे. आविष्कार या नाट्यसंस्थेतर्फे अरुण काकडे यांनी आयुष्यभर प्रायोगिक रंगभूमीची सेवा करून ती चळवळ चालवली. प्रायोगिक रंगभूमी आणि आविष्कार या संस्थेचे अस्तित्त्व टिकून रहावे यासाठी काकडे यांनी मोठे योगदान दिले. त्यांनी मोठ्या जिद्दीने आणि चिकाटीने “आविष्कार’ ही संस्था सुरू ठेवली. आविष्कारने उभ्या केलेल्या छबिलदास चळवळीतून अनेक नाट्यसंस्था आणि नाट्यकर्मी पुढे आले. रंगभूमीवरचे अनेक महत्त्वाचे प्रयोग या चळवळीच्या माध्यमातून झाले. नवी पिढी घडवली गेली. नव्या पिढीमध्येही प्रायोगिक रंगभूमीविषयी प्रेम निर्माण व्हावे यासाठी अरुण काकडे हे झटत राहिले आणि त्यांना त्यामध्ये बऱ्याच अंशी यशही आले. त्यांच्या योगदानाचा गौरव भारतीय संगीत नाटक अकादमीने त्यांना गौरव पुरस्कार देऊन केला होता.

आविष्कारतर्फे सादर करण्यात आलेले अरविंद देशपांडे दिग्दर्शित “शांतता कोर्ट चालू आहे’ हे नाटक खूप चालले. या नाटकाने किती लोकप्रियता मिळवली हे साऱ्यांनाच माहीत आहे. यातील सुलभा देशपांडे यांची भूमिका खूप गाजली. या नाटकात अरुण काकडे यांनीही छोटे काम केले होते. या नाटकात कलाकारांचा मोठा ग्रुप होता. या नाटकाचा शेवट अरुण काकडे यांनी रंगवलेल्या व्यक्‍तीरेखेवरच होतो असा त्याचा भाग होता. तथापि, त्यांनी नाटकात काम करण्यापेक्षा पडद्यामागे राहून प्रायोगिक रंगभूमीसाठी काम करणे अधिक पसंत केले आणि त्यासाठी ते वर्षानुवर्षे झटत राहिले. त्यांनी दिलेले योगदान हा प्रायोगिक रंगभूमीतील मोठा भाग आहे.

अरुण काकडे यांनी प्रायोगिक नाटकांच्या प्रॉडक्‍शनकडे अधिक लक्ष वेधले. आविष्कार या संस्थेचा कारभार, तिला मिळणारी अनुदाने इत्यादी गोष्टींवरही त्यांनी लक्ष केंद्रित केले. त्यांनी अभिनेता किंवा नाटकांचा लेखक होण्यापेक्षा ऑर्गनायझर म्हणून अधिक काम केले. आपल्या कामातून प्रायोगिक रंगभूमीचा विकास झाला पाहिजे, ही रंगभूमी टिकून तिला जीवदान मिळाले पाहिजे असा त्यांचा सतत आग्रह राहिला. अभिनेता किंवा अभिनेत्री त्यांच्या अभिनयामुळे थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. पण काकडे हे पडद्यामागे राहून कार्यरत राहणारे कलाकार होते. त्यामुळे त्यांचे नाव फारसे कोणाला माहीत नव्हते; पण, नाट्यक्षेत्रात काम करणाऱ्यांना त्यांच्या कामाची जाणीव आहे. अरुण काकडे हे हाडाचे कार्यकर्ते होते. ते स्वतः नवनव्या कलाकारांना ऊर्जा पुरवीत राहिले. त्यांच्या कामाला चालना देत राहिले.

अरुण काकडे यांनी नवनवीन कलाकारांना बरोबर घेऊन काम केले. व्यावसायिक नाटकांच्या तुलनेत प्रायोगिक नाटके प्रेक्षकांपर्यंत फारशी पोहोचत नाहीत असे म्हटले जाते. याचे कारण प्रायोगिक नाटकांना मर्यादित यश मिळते आणि त्याचा प्रेक्षकवर्गही मर्यादित असतो. विशिष्ट प्रेक्षकवर्ग प्रायोगिक नाटके पहायला येतो. व्यावसायिक नाटकांचे तसे असत नाही. नाटक पाहण्याची हौस असणारा प्रेक्षक ते पाहण्यासाठी उपस्थित राहतो. त्यामुळे त्या नाटकांचा बोलबाला अधिक होतो. अरुण काकडे यांचे वैशिष्ट असे की त्यांनी प्रायोगिक नाटकांना व्यावसायिक नाटकांच्या तुलनेत कमी प्रेक्षकवर्ग असतानाही आविष्कार ही संस्था आणि प्रायोगिक नाटके चालवली. अनेक अडचणी येऊनही आविष्कार ही संस्था सुरु राहिली. त्यामध्ये काकडे यांचे योगदान मोठे आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे, त्यांचे पती अरविंद देशपांडे, अरुण काकडे हे आधी रंगायन संस्थेत होते. त्यानंतर रंगायन ही संस्था फुटली. त्यावेळी अरविंद देशपांडे आणि सुलभा देशपांडे यांच्याबरोबर अरुण काकडेच होते. देशपांडे दांपत्त्य नाही म्हटल्यावर त्यांनीही रंगायन ही संस्था सोडली आणि ते या दोघांबरोबर येऊन त्यांनी आविष्कार ही संस्था स्थापन केली. देशपांडे दांपत्त्यही अरुण काकडे यांच्याकडील ताकद ओळखून होते. रंगायन ही देखील व्यावसायिक संस्था नव्हती. पण, तेथे मतभेद झाले आणि देशपांडे दांपत्य तेथून बाहेर पडले. त्यांना अरुण काकडे यांनीच त्या काळात साथ दिली. या संस्थेच्या व्यवस्थापनाची धुरा त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली.

अरुण काकडे आणि माझा स्नेह अनेक वर्षांपासून होता. पण, आमच्या भेटीगाठी फारशा होत नसत. कधी मी त्यांच्या नाटकाला गेलो तर तेवढ्यापुरत्या भेटी होत. अशा भेटी झाल्या की प्रायोगिक नाटकाविषयी आमच्यात खूप चर्चा होत. अरुण काकडे यांना रंगभूमीविषयी सर्वांगीण माहिती होती आणि त्या माहितीचा ते चांगला उपयोग करृन घेत असत. शांतता कोर्ट चालू आहे या आविष्कारच्या नाटकाव्यतिरिक्‍त इतरही नाटके रंगभूमीवर आली आणि प्रायोगिक नाटकांच्या प्रेक्षकांकडून त्यांना प्रतिसादही चांगला मिळाली. काहीही झाले तरी प्रायोगिक रंगभूमीच्या चळवळीपासून मागे हटायचे नाही असा त्यांचा निर्धार होता. आधी या संस्थेची नाटके छबीलदासमध्ये होत असत. पण, देशपांडे, काकडे हे त्या संस्थेतून बाहेर पडल्यानंतर आविष्कार या संस्थेची तेथे होणारी नाटके काही दिवसानंतर छबीलदासच्या मॅनेजमेंटने बंद केली. त्यानंतर या संस्थेने माहिमच्या म्युनिसिपालिटीच्या शाळेत आपला संसार थाटला. नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष बनल्यानंतरही त्यांचे प्रायोगिक रंगभूमीसाठीचे काम सुरूच राहिले. आज त्यांच्या जाण्यामुळे समांतर रंगभूमीचा आधारस्तंभ हरपला आहे.

रत्नाकर मतकरी

Leave A Reply

Your email address will not be published.