सुरेल दिवाळी

दिवाळी चार-पाच दिवसांवर आली आहे. या आठवड्यातच शुक्रवारी, म्हणजे 25 तारखेला वसुबारस-धनतेरस, रविवारी लक्ष्मीपूजन, सोमवारी पाडवा आणि मंगळवारी भाऊबीज. हा हा म्हणता दिवस निघून जातील. ते कसे जातात हे कळतही नाही. तरी या वर्षी मुलांना सुट्ट्या उशिरा आहेत. निवडणुकांमुळे दिवाळीच्या सुट्ट्या तीन दिवस पुढे ढकलल्याचे-21 ऐवजी 24 पासून केल्याचे वृत्तपत्रात वाचले होते. म्हणजे दिवाळीपूर्वी एकच दिवस मुलांना सुट्टी लागणार.

 

पावसाप्रमाणे आता सुट्ट्याही बदलू लागल्या आहेत. आमच्या वेळी दिवाळीपूर्वी चांगली आठ-दहा दिवस सुट्टी असायची आणि दिवाळी झाल्यावरही आठ-दहा दिवस असायची. तेव्हा फुलपाखरासारखे दिवाळीचे दिवस उडून जायचे. सुट्टी लागली की आईला मदत करायची, मैत्रिणींबरोबर खेळायचे, फराळही दिवाळीच्या अगोदरच तयार व्हायचा-तो जातायेता खायचा, संध्याकाळी फटाके उडवायचे… ते दिवाळीनंतरही उरायचे. सुट्टी संपली तरी फटाके वाजत राहायचे ते अगदी तुळशीच्या लग्नापर्यंत. या साऱ्या आनंदानंतर सुट्टी संपवून शाळेत जायला नवा उत्साह आलेला असायचा.
आता मात्र दिवाळी म्हटली की अगोदर समोर पडलेला कामाचा डोंगर दिसतो. घराची साफसफाई-सर्व रूम्स चकाचक करणे, कपडे आवरणे, भांडी-वापरात असलेली आणि नसलेलीही काढून अगदी चमकवायची आणि नीट मांडून ठेवायची. दिवाळीच्या फराळाचे खास डबे आहेत, पूर्वीपासूनच. तेव्हा डबे भरभरून फराळाचे व्हायचे. चिवडा, चकली आणि दोनतीन प्रकारचे लाडू तर डबे भरून उरायचे, पण त्यांचा कधी फडशा पडला हे कळतही नसे. अनारसे मात्र खास लक्ष्मीपूजनासाठीच असायचे. त्यापूर्वी त्यांना हात लावायला मिळत नसे. पूर्वी घरात कामे करणारी भावंडे आणि मोठी माणसे मिळून कितीतरी हात असायचे आणि खेळीमेळीत कामे पटकन उरकली जायची. आता सारा एकटीचा कारभार. त्यात मजा नाही.

आता मात्र मी अगदी मोजक्‍या प्रमाणातच सारे करते. फराळाचे डबे भरत नाहीत आणि लवकर रिकामे होतही नाहीत. खाणारी इनमीन तीन माणसे आणि ती ही उत्साही नाहीत, पूर्वीसारखी फराळाची ताटे दिली-घेतली जात नाहीत. फराळासाठी जाणेयेणेही पूर्वीसारखे होत नाही. सारा रेडिमेडचा जमाना. फराळापासून कपड्यापर्यंत. पूर्वी दिवाळीसाठी खास कपडे शिवून घेतले जायचे. तो एक मोठा आनंद असायचा. तेव्हा नवे कपडे म्हणजे दिवाळीतच मिळायचे, किंवा घरात काही लग्नकार्य असले तर. आता नाही म्हटले तरी दिवाळीच्या तयारीला पूर्वीसारखा उत्साह वाटत नाही. खरं सांगायचं तर आजकाल सणाचे वातावरणच वाटत नाही. बाहेर तर नाहीच नाही, घरातही नाही. म्हणजे सगळीकडे सारा झगमगाट असतो. बाजार भरभरून वाहात असतात. साधा आकाशकंदील घ्यायला गेले तरी हा घेऊ की तो घेऊ अशी द्विधा अवस्था होते आणि त्यांच्या किमती ऐकल्या तर मन चक्रावून जाते. पाचशे-हजारपर्यंत रुपयांचे आकाशदिवे?
मात्र, आता फटाक्‍यांचा आनंद मोठा असतो, फारच मोठा.

पूर्वीचे फुलबाजे, भुईनळे, लवंगी फटाके, लक्ष्मी बार, ऍटमबॉंब यांच्या तुलनेत आजची फटाक्‍यांची आतषबाजी खरोखरच नेत्रदीपक (आणि कानठळ्या बसवणारीही. या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरलेल्या फटाक्‍यांच्या माळा लागल्या की कानठळ्या बसतातच पण सारे वातावरण धुरकट होऊन जाते.) आम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी उशिरा पर्वतीवर जातो. तेथून शहरात चाललेली आतषबाजी पाहायला मोठी मजा येते आणि दुसरा एक आनंद दिवाळी पहाटेचा. सुरेल दिवाळी पहाटनंतर सारा दिवसच नाही, तर वर्षही सुरेल होऊन जाते.

योगिता जगदाळे

Leave A Reply

Your email address will not be published.