कुंकू : अनमोल ठेवा

दिवाळीनिमित्त घराची साफसफाई, कपाट, बॅगा यांची आवराआवरी करताना हाती एक अनमोल ठेवा लागला. तो म्हणजे अल्बम, माझ्या लग्नातला. फोटो बघताना एका फोटोवर नजर खिळून राहिली. साजिरी गोजिरी पूर्ण सवाष्ण साज ल्यायलेली ठसठशीत कुंकू लावलेली भारदस्त, सात्विक, वात्सल्याची मूर्ती, माझी माय.

तो फोटो पाहून मी नकळत भूतकाळात गेले. कारण माझ्या वडिलांना जाऊन 28 वर्षे झाली त्यामुळे त्यावेळचं तिचं हे जे तेजस्वी रूप आठवणींच्या पलीकडे जाऊन लपलं होतं. ते डोळ्यापुढे तरळू लागले. अनेक आठवणी जाग्या झाल्या. आईच रूप म्हणजे साक्षात लक्ष्मी दिसे. नऊवारी. मध्यम बांधा, मध्यम उंची, हसरा प्रसन्न चेहरा, गळ्यात गंठण, पायात ठसठशीत जोडवी आणि कपाळावरचे कोरीव ठसठशीत लालचुटूक कुंकू! तेही कपाळावर लावतानाही आधी मेण लावून नंतर दोन बोटांनी चिमटीत कुंकवाच्या कोयरीतले कुंकू घेऊन त्यातलेच अनामिकेने बोटाच्या पहिल्या पेराच्या आकाराएवढे जाड आणि लांब असे आडवे कुंकू ती सराईतपणे लावी.

कुंकवाचे खरे तर कितीतरी प्रकार आहेत गोल, उभे, आडवे, बदामी लांबट गोल जुन्या रुपायाएवढा टिळा लावणाऱ्या महिला अजूनही ग्रामीण भागात दिसतात. चांद्रकोरीचेही बरेच प्रकार आहेत. आता तर टिकल्यांचा जमाना आहे. विविध प्रकारच्या हव्या तशा रंगांच्या खड्यांच्या, मोत्यांच्या, सोनेरी, चंदेरी, विविध आकार आणि प्रकार दुकानात आहेत. टिकल्यांच्या दुकानात गेले की प्रथम हरखून आणि मग हरवून जायला होतं!

माझ्या आईने केलेल्या साध्या पिठलं भाताची चव अजूनही जिभेवर रेंगाळते. घरी येणारा प्रत्येक जण तृप्त होऊनच जाई. आज ती 93 वर्षांची आहे. हसतमुख प्रसन्न आणि विनोदी. कुरकुर हा शब्द तिच्या शब्दकोशातच नाही! फोटो आणि कुंकू या दोन गोष्टींच्या आठवणीत मनाचं पाखरू कुठल्या कुठे भूतकाळात फिरून आलं. मन पाखरू पाखरू आता होतं भुईवर, गेलं आभाळात, असं माझं झालं होतं.

अनुराधा पवार

Leave A Reply

Your email address will not be published.