सिडनी – कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज होत असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात यश मिळवत विजयी सलामी देण्यासाठी सज्ज झाला आहे.
करोनाचा धोका अद्याप कायम असतानाही या मालिकेवरील संभ्रमाचे वातावरण दूर झाले व आज होत असलेल्या पहिल्या सामन्यापासून एकदिवसीय तीन सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होत आहे. करोना काळात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडमध्ये मालिका खेळली आहे. मात्र, मार्च महिन्यांत सुरू झालेल्या करोनाच्या धोक्यामुळे अनेक स्पर्धा व मालिका रद्द झाल्यानंतर आता भारतीय संघ पहिलाच परदेश दौरा करत असून पहिलीच मालिका खेळत आहे. अर्थात, अमिरातीत आयपीएल स्पर्धा बिनधोकपणे पार पडल्यामुळे या मालिकेसाठी संघात समावेश असलेल्या भारतीय क्रिकेटपटूंना चांगला सराव मिळाला असल्याने ते यजमान संघासमोर मोठे आव्हान निर्माण करण्याची शक्यता आहे.
कर्णधार कोहलीसाठी आयपीएल स्पर्धा फारशी यशदायी ठरली नसली तरीही या मालिकेचे महत्त्व लक्षात घेता त्याच्याकडून अत्यंत जबाबदार खेळाची अपेक्षा आहे. भारताच्या एकदिवसीय संघात सलामीवीर म्हणून चार खेळाडूंना एकमेकांशी स्पर्धा करावी लागत असल्ययामुळे भारताकडे सेकंड बेंच किती भक्कम आहे याचीही साक्ष पटते.
शिखर धवनसह सलामीला मयंक आगरवाल, लोकेश राहुल, शुभमन गिल व श्रेयस अय्यर यांच्यापैकी एकाला संधी मिळेल. त्यातही राहुल किंवा आगरवाल यांचे पारडे जड वाटत आहे. राहुल, धवन व आगरवाल यांनी आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली असल्याने गिल किंवा अय्यरला खेळवण्याचा धोका कोहली पत्करणार नाही. स्वतः कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत असल्यामुळे व संघात मनीष पांडे व हार्दिक पंड्या असल्याने गिलला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरावे लागेल. या भक्कम फलंदाजीमुळे भारतीय संघाची मधली फळी बलाढ्य बनली आहे.
संघात धवन, आगरवाल, राहुल, कोहली, पांडे, पंड्या, अय्यर व रवींद्र जडेजा अशी आक्रमक फलंदाजी सज्ज आहे. यजमान संघाच्या फलंदाजीवर अंकुश राखण्यासाठी गोलंदाजीही देखील भेदक आहे. प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह व महंमद शमी यांच्या जोडीला नवोदित नवदीप सैनीदेखील आपली निवड सार्थ ठरवण्यासाठी उत्सुक आहे.
यजुवेंद्र चहल व कुलदीप यादव यांच्यापैकी एकाच फिरकी गोलंदाजाला संघात स्थान मिळण्याची शक्यता आसली तरीही चहलचेच पारडे जड राहणार आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत सरस कामगिरी केल्यामुळे तसेच संघात डावखुरा फिरकी गोलंदाज जडेजा असल्याने कुलदीपला संधी मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे.
यजमान संघाबाबत बोलायचे झाले तर आयपीएलमधील अपयशी कामगिरी केलेल्या ऍरन फिंचकडेच त्यांच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्व राहणार आहे. त्याच्यासह सलामीला डेव्हिड वॉर्नर असल्याने भारताच्या गोलंदाजांना सुरुवातीपासूनच भेदक गोलंदाजी करत त्यांच्यावर वर्चस्व राखावे लागणार आहे. त्यांची मधळी फळी जास्त सरस वाटते. माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ, मार्नस लेबूशेन, यष्टीरक्षक फलंदाज ऍलेक्स केरी, मॅथ्यू वेड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोनिस अशी त्यांची फलंदाजी सशक्त आहे. अर्थात त्यापैकी स्मिथ, स्टोनिस व मॅक्सवेल यांना आयपीएल स्पर्धेत सराव मिळाला आहे.
त्यातही स्मिथ व स्टोनिस यांनीच सातत्यपूर्ण खेळी केली आहे, मॅक्सवेल संपूर्ण आयपीएल स्पर्धेत अपयशी ठरला असल्याने त्याला या सामन्यात आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागणार असून तो अपयशी ठरला तर त्याला संघातील स्थान गमवावे लागण्याची शक्यता आहे. त्यांची गोलंदाजी पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, ऍडम झम्पा व जोश हेझलवूड अशी वैविध्यपूर्ण असली तरीही कमिन्स व स्टार्क हेच भारताच्या फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकतात. स्टार्क पूर्ण तंदुरुस्त आहे का असा सवालही निर्माण होत असल्याने त्यांना फिरकी गोलंदाज झम्पा तसेच मध्यमगती गोलंदाज हेझलवूड यांच्यावरच जास्त अवलंबून राहावे लागणार आहे.
चहल ट्रम्पकार्ड ठरेल…
भारतीय संघाचा लेग स्पीन गोलंदाज यजुवेंद्र चहल हा ट्रम्पकार्ड ठरण्याची शक्यता आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत आपल्या गोलंदाजीच्या जोरावर भल्या भल्या फलंदाजांना नाचवले आहे. त्याच्या रॉयल चॅलेंजर बेंगळुरू संघाला फारसे यश मिळाले नसले तरीही चहलची कामगिरी प्रत्येक सामन्यात अफलातून झाली होती.
सिडनी मैदावरील खेळपट्टी सुरुवातीला तरी वेगवान गोलंदाजीला मदत करणारी ठरत असली तरीही चेंडू जुना झाल्यावर या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांनीच वर्चस्व राखले आहे. दोन्ही संघातील फिरकी गोलंदाजांची गुणवत्ता पाहिली तर चहलच जास्त उजवा ठरेल.