अग्रलेख : महानतेची एक्‍झिट

“तो आला, त्याने पाहिले व तो जिंकला’, हेच सूत्र संपूर्ण कारकिर्दीत सार्थ ठरवणारा महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे निधन झाले. 1980चे दशक, कसे विसरता येईल की या माणसाने क्रिकेटवेड्या आपल्या देशाला फुटबॉल पाहण्याचीही आवड निर्माण केली. त्यांची एक्‍झिटही मनाला चटका लावणारी ठरली. फुटबॉल सम्राट पेले यांचा सुवर्णकाळ संपला आणि मॅराडोनाचे राज्य जागतिक फुटबॉलमध्ये सुरू झाले.

1986 साली झालेल्या फुटबॉल विश्‍वकरंडक स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात अर्जेंटिनाच्या या महान खेळाडूने चक्‍क हाताने केलेला गोलही ग्राह्य धरला गेला व हाच गोल नंतर “हॅंड ऑफ गॉड’ म्हणून प्रसिद्ध झाला. त्यांनी केलेला हा गोल रिप्लेमध्ये चक्‍क हाताने केलेला स्पष्ट दिसला होता. हाच गोल विसाव्या शतकातील सर्वोत्तम गोल ठरला. हा फक्‍त दोन देशांमधील फुटबॉल सामना नव्हता, तर इंग्लंडचा बदला घेण्याच्या इराद्याने मॅराडोना मैदानात उतरले होते. 1982 साली फॉकलॅंड बेटावरून इंग्लंड आणि अर्जेंटिनात युद्ध झाले. त्या युद्धात अर्जेंटिनाचा पराभव झाला. त्यामुळे 1986 च्या सामन्यातील इंग्लंडवरील विजय हा एकप्रकारचा बदलाच होता. 2000 साली मॅराडोना यांनी आपल्या “आय एम दिएगो’ या आत्मचरित्रात हा उल्लेख केला आहे.

“इंग्लंडवरील विजय म्हणजे आमच्या राष्ट्रध्वजाचे आम्ही केलेले रक्षण होते’, अशा शब्दांत त्यावेळी मॅराडोना यांनी आपल्या भावना व्यक्‍त केल्या होत्या. एखाद्या खेळाडूचा स्पर्श हा परिसस्पर्श ठरतो, तसेच काहीसे झाले व अर्जेंटिनाने ब्राझीलचे सार्वभौमत्व संपुष्टात आणताना “जागतिक फुटबॉल’वर आपले वर्चस्व निर्माण केले. त्यात मॅराडोनाचा वाटा सर्वात मोठा व महत्त्वाचा ठरला. यानंतर मॅराडोना विरुद्ध जागतिक फुटबॉलपटू असे समीकरण तयार झाले. त्याला एकट्याला रोखण्यासाठी चार-चार खेळाडू उभे राहात होते व त्यातूनही हा माणूस आपली गुणवत्ता सिद्ध करताना झिरो अँगलमधून गोल करत होता. त्यांच्या याच कर्तबगारीला पेले यांनी “दैवी चमत्कार’ म्हटले होते.

1986 च्या स्पर्धेपूर्वी मॅराडोना यांना नापोली क्‍लबकडून खेळण्याची संधी मिळाली व त्यांनी अपयशाच्या गर्तेत सापडलेल्या संघाला सलग दोन विजेतेपद मिळवून दिले. याच स्पर्धेपासून मॅराडोनाची एक सामान्य खेळाडू ते महान फुटबॉलपटू अशी वाटचाल सुरू झाली. मॅराडोना हाच आधुनिक फुटबॉलचा सर्वांत महान खेळाडू आहे, असे खुद्द पेलेच म्हणाले होते, यातच त्यांचे मोठेपण सिद्ध होते. 1990 साली झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेतही मॅराडोना यांच्याच जादूमुळे अर्जेंटिनाचा संघ अंतिम फेरीत दाखल झाला होता. वयाच्या 15 व्या वर्षी अर्जेंटिनोस क्‍लबकडून खेळताना आपला दर्जा दाखवत त्यांनी काही दिवसांतच राष्ट्रीय स्पर्धेत आपली प्रतिभा सिद्ध केली. त्यांचा त्या वयातील खेळ पाहूनच पेले यांनी “हा मुलगा महान खेळाडू बनेल’, असे केलेले भाकितही खरे ठरले.

वयाच्या 17 व्या वर्षीच देशाकडून खेळण्याची त्यांची संधी हुकली होती. मात्र, तरीही त्यांनी निराश न होता आपला खेळ सरस ठेवला व योग्य वेळी मिळालेल्या संधीचा लाभ घेत देशाला फुटबॉलमधील महासत्ता बनवले. 1994 सालच्या स्पर्धेत मॅराडोनाने अर्जेंटिनाचे नेतृत्व केले होते. त्यावेळी घेण्यात आलेल्या उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत ते दोषी आढळले व त्यांच्यावर 15 महिन्यांची बंदी लावली गेली. त्यानंतर ते मानसिकरित्या खचले. त्यांची ड्रग्जची सवय वाढत गेली. अखेर 1997 साली त्यांनी फुटबॉलमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर ते जेव्हा ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर आले तेव्हा 2008 साली त्यांना अर्जेंटिना संघाचे प्रशिक्षकपदही दिले गेले. मात्र, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जेंटिना संघ फारशी यशस्वी कामगिरी करू शकला नाही व त्यानंतर मॅराडोना यांना हे पद गमवावे लागले. त्यानंतर त्यांनी अनेकदा सल्लागार प्रशिक्षक म्हणून अनेक देशांना तसेच युरोप व अमेरिकेतील अनेक क्‍लबला मार्गदर्शन केले.

फुटबॉलचे जाणकार म्हणून वाहिन्यांवरही आपली मते मांडली तसेच काही सामन्यांचे समालोचनही केले. त्यांच्यावर बंदीची झालेली कारवाई, त्यांनी विविध राजकीय व्यक्‍तींवर केलेली टीका यामुळे त्यांनाही अनेकदा टीकेचे धनी व्हावे लागले. मात्र, इतके सगळे होऊनही त्यांची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही. त्यांच्या नावाचे वलयच इतके मोठे होते की हयात असतानाच ते दंतकथा ठरले होते. खेळाचे मैदान वगळता मॅराडोना यांना राजकारणातही रस होता. त्यांनी कधी स्वतः राजकीय व्यक्‍ती बनण्याचा प्रयत्न केला नसला तरी जगभरातील विविध प्रसिद्ध राजकारण्यांशी त्यांची मैत्री होती. क्‍युबाचे अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांच्याशी मॅराडोना यांची असलेली मैत्री त्यावेळी खूप गाजली होती.

“कॅस्ट्रो मला पित्यासमान असल्याचे’ मॅराडोना यांनी सांगितले होते. लॅटिन अमेरिकन देशातील या दोघांमधील मैत्रीची चर्चा त्यावेळी माध्यमांमध्ये सातत्याने चर्चिली गेली. मॅरेडोना जरी फुटबॉलपटू असले तरीही त्यांनी अनेकदा व्यक्‍त केलेल्या राजकीय मतांमुळे त्यांच्यावर टीकाही भरपूर झाली. मात्र, जे मला पटते तेच मी बोलतो व त्यावर कायम ठाम राहील, असेही ते नेहमी म्हणायचे. आपल्याला जे रुचेल ते मत मांडताना त्यांनी कधीही परिणामांची चिंता केली नाही. हाच त्यांचा धडाकेबाज स्वभाव त्यांना त्यावेळी अन्य खेळाडूंपेक्षा जास्त लोकप्रियता मिळवून देणारा ठरला. लॅटिन अमेरिकेतील डाव्या विचारसरणीच्या राजकारण्यांचे त्यांनी कायमच कौतुक केले.

खरेतर कारकीर्द गाजत असतानाच मॅराडोना यांना उत्तेजक द्रव्य सेवनाची चटक लागली व तिथेच त्यांच्या प्रामाणिक प्रतिमेला तडा गेला. ही सवय इतकी पराकोटीला गेली की त्यांना रिहॅबमध्ये उपचार करण्यासाठी क्‍यूबामध्ये राहावे लागले. त्यावेळी त्यांची प्रतिमा इतकी डागाळली गेली की खुद्द त्यांच्याच अर्जेंटिना देशातील वैद्यकीय तज्ज्ञांनी त्यांना उपचार नाकारले होते. त्यानंतर त्यांनी क्‍यूबा गाठले. अर्थात, त्यांचे मित्र कॅस्ट्रो हेच त्या देशाचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्यात वारंवार भेट होत राहिली व त्यांच्याच मार्गदर्शनामुळे मॅराडोना ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर येऊ शकले. या दोघांच्या मृत्यूबाबतही अनोखा योगायोग घडला.

मॅराडोना यांचा मृत्यू 25 नोव्हेंबरला झाला तर कॅस्ट्रो यांचाही मृत्यू याच दिवशी चार वर्षांपूर्वी झाला होता. असो, ते एक व्यक्‍ती म्हणून कसे होते, मैदानाबाहेर कसे होते यावर चर्चा त्यावेळीही झाल्या व आताही त्यांच्या निधनाचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावरही सुरू झाल्या आहेत. मात्र, हा महान खेळाडू तेव्हाही चाहत्यांचा जीव की प्राण होता व यापुढेही कायम राहील. लहानपण एका झोपडीत घालवलेला हा खेळाडू त्यानंतर मात्र, गडगंज संपत्तीचा मालक बनला.

ड्रग्जने त्याला एकवेळ रस्त्यावर यायची वेळ आणली मात्र, त्यातूनही तो आपल्या जिद्दीच्या जोरावर बाहेर आला व चक्‍क आपल्याच देशाचा प्रशिक्षकही बनला. इतक्‍या अनपेक्षित पालटांना सामोरे गेलेला हा जगातील एकमेव फुटबॉलपटू आसावा. वयाची साठी पार केल्यानंतर काही दिवसांतच या महान फुटबॉलपटूने घेतलेली एक्‍झिट चाहत्यांच्या मनाला निश्‍चितच चटका लावून गेली. शेवटी असेच म्हणावे लागेल की भविष्यात जेव्हा जेव्हा कोणी खेळाडू “10 क्रमांका’ची जर्सी परिधान करून फुटबॉलच्या मैदानात उतरेल तेव्हा तेव्हा मॅराडोना यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.