मुंबई – भारतीय अर्थव्यवस्था खात्रीने पुन्हा रुळावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर संदिग्धता संपून अमेरिकेत अध्यक्षपदावर जोसेफ बीदेन निवडून येण्याची शक्यता आहे. या कारणामुळे शेअर बाजारात जोरदार खरेदी झाली. त्यामुळे सलग चौथ्या दिवशी निर्देशांकात वाढ झाली. आता शेअर बाजार निर्देशांक 9 महिन्याच्या उच्चांकी पातळीवर असून या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत करोना व्हायरसमुळे झालेला घसारा भरून निघाला आहे.
गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 724 अंकांनी म्हणजे 1.78 टक्क्यानी वाढून 41,340 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 211 अंकांनी वाढून 12,120 अंकांवर बंद झाला. फेब्रुवारीच्या मध्यानंतर निर्देशांक प्रथमच इतक्या उच्च पातळीवर बंद झाले आहेत.
आजच्या खरेदीचा जोर इतका होता की रिऍल्टी क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्राचे निर्देशांक वाढले. धातु क्षेत्र निर्देशांक 4.43 टक्क्यांनी, तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्राचा निर्देशांक 3.19 टक्क्यांनी उर्जा क्षेत्राचा निर्देशांक 2.39 टक्क्यांनी तर बॅंकिंग क्षेत्राचा निर्देशांक 2.14 टक्क्यांनी वाढले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप पावणेदोन टक्क्यांपर्यंत वाढले.
शेअर बाजार निर्देशांकामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे काल घसरलेला रुपया आज उसळला. आज रुपयाचे मूल्य 40 पैशांनी वाढून ते 74 रुपये 36 पैसे प्रति डॉलर झाले.
ऍन्जेल ब्रोकींगचे विश्लेषक समीत चव्हाण यानी सांगितले की आता निर्देशांक करोनच्या अगोदच्या काळातील पातळीवर आले आहेत. आता निफ्टीला 11,600 पातळीवर मजबूत आधार असून परिस्थिती अशीच राहील्यास निफ्टी 12,400 पर्यंत मार्गाक्रमण करू शकतो.
जोरदार खरेदीचे कारण…
अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्षाचे जोसेफ बिदेन अध्यक्षपदावर निवडून येण्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरी येथील लोकप्रतिनिधीगृह आणि सिनेटमधील परिस्थिती पूर्वीसारखीच राहणार आहे. सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे बहुमत कायम राहण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे नवे अध्यक्ष करवाढ करू शकणार नाहीत. त्याचबरोबर अमेरिकेतील फेडरल रिझर्व लवकरच उदार धोरण चालू ठेवण्याची घोषणा करणार आहे. या कारणामुळे जागतिक गुंतवणूकदार आशावादी झाले आहेत. बिदेन यांच्या काळात अमेरिका-चीन संघर्ष कमी होण्याची शक्यता आहे, असे गुंतवणूकदारांना वाटते.