मुंबई – स्थूल अर्थव्यवस्थेची स्थिती फारशी आशादायक नसतानाही भारतातील शेअर निर्देशांक वाढले असल्याची चर्चा चालू आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी शेअरबाजारात मोठी नफेखोरी होऊन निर्देशांक घसरले. मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 667 अंकांनी म्हणजे 1.77 टक्क्यांनी कोसळून 36,939 अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 181 अंकांनी कोसळून 10,891 अंकांवर बंद झाला. गेल्या पंधरवड्यात रिलायन्स व एचडीएफसी बॅंकेचे शेअर वधारले होते. आज नफेखोरीसाठी गुंतवणूकदारांनी या दोन कंपन्यांच्या शेअरची मोठ्या प्रमाणात विक्री केली.
भारतातील आणि जगातील करोना संसर्गाची संख्या वाढत आहे. यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार सावध झाले आहेत. त्यांनी विक्री चालू केल्याचे चित्र बाजारात निर्माण झाले आहे. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदार विक्री करीत आहे. निर्देशांक कोसळल्याचा परिणाम आज रुपयाच्या मूल्यावर झाला. रुपयाचे मूल्य आज वीस पैशांनी कोसळले.
जागतिक बाजारात सकारात्मक आज वातावरण होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून गुंतवणूकदारांनी विक्री केली. सोमवारी जुलै महिन्यातील मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा नकारात्मक उत्पादकता निर्देशांक जाहीर झाला. गेल्या चार महिन्यांपासून हा निर्देशांक 50 च्या खाली आहे.
आज झालेल्या विक्रीचा फटका बॅंकिंग, वित्त, ऊर्जा, तेल आणि नैसर्गिक वायू, दूरसंचार क्षेत्रांना बसला. एका क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्सचे भाव 2.73 टक्क्यांपर्यंत कमी झाले.