नवी दिल्ली – करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने विविध क्रीडा स्पर्धांना येत्या काळात प्रेक्षकांना परवानगी मिळेल असे वाटत नाही. त्यामुळे खेळाडूंनाही मैदाने किंवा बॅडमिंटन कोर्ट रिकामी असलेली पाहण्याची सवय करून घ्यावी लागणार आहे. अर्थात, ही सवयदेखील पुढील काळात अंगवळणी पडेल, असे मत भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने व्यक्त केले आहे.
मार्च महिन्यापासून करोनाचा धोका वाढला व क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्या. आता येत्या काळात हा धोका कमी झाल्यावर स्पर्धा जरी सुरू करण्यात आल्या तरीही त्यातील सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना मैदानांवर तसेच क्रीडा संकुलांमध्ये उपस्थित राहण्याची परवानगी मिळेल असे वाटत नाही. त्यामुळे प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत खेळ करण्याची सवय खेळाडूंना अंगी लावून घ्यावी लागणार आहे. सुरुवातीला थोडे जड जाईल. मात्र, त्याची देखील सवय होईल, असे सिंधू म्हणाली. करोनाच्या पार्श्वभूमीवर लेट द बर्ड फ्लाय, मुव्ह ऑन विथ बॅडमिंटन अशा बोधवाक्याने एका क्रीडा मोहिमेला सिंधूच्या ऑनलाइन उपस्थितीत सुरुवात झाली त्यावेळी तिने आपली मते मांडली.