नगर – नगर तालुक्यातील बारदरी येथे पतीने पत्नीच्या नावावर दोन एकर जमीन करून द्यावी यासाठी पत्नीसह इतर चौघांनी एकाला लोखंडी रॉड व गजाने जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात पत्नी व इतर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजाराम बाबुराव दगडखैर यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून त्यांची पत्नी सुरेखा राजाराम दगडखैर, संतोष काशिनाथ पोटे, काशिनाथ रामभाऊ पोटे, संजना काशिनाथ पोटे (रा. बारदरी ता. नगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी (दि.12) रात्री आठच्या सुमारास महाल फाटा ते बारदरी रस्त्यादरम्यान रमजान शेख यांच्या वस्तीजवळ राजाराम दगडखैर यांना चौघांनी धरले. मागील प्रेमसंबंधाच्या कारणपुुढे करत व सुरेखाच्या नावावर दोन एकर जमीन करून देण्याच्या कारणावरून लोखंडी रॉड, गज व लाथाबुक्यांने मारहाण केली. शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी राजाराम दगडखैर याने नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चौघांवर खुनाचा प्रयत्न करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.