शनि शिंगनापूर येथे लवकरच सुरुवात
पुणे – यापुढे शनी शिंगनापूर देवस्थानच्या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना शाल, श्रीफळ नाही तर, पुस्तक देऊन सन्मान करण्यात येणार आहे. सह धर्मादाय आयुक्त, पुणे कार्यालयाकडून हा अभिनव उपक्रम घेण्यात आला असून, येत्या काही दिवसांतच हा उपक्रम सुरू होणार आहे, अशी माहिती धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली.
महाराष्ट्र राज्यात ज्योतीर्लिंग, अष्टविनायक यासह प्रसिद्ध देवस्थान आहेत. त्यामध्ये श्री क्षेत्र आळंदी, देहू, जेजुरीगड, शिर्डी, शनी शिंगनापूर, त्रिंबकेश्वर, पंढरपूर, सप्तश्रुंगी माता, चतु:शृंगी, तुळजापूर, कोल्हापूरातील अंबाबाई माता, नृसिंहवाडी, अक्कलकोट, शेगाव यासह अनेक देवस्थान आहेत. याठिकाणी दररोज महत्त्वाची आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्ती दर्शनासाठी येतात. त्यावेळी देवस्थानकडून या महत्त्वाच्या व्यक्तींना शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करतात. एवढच नव्हे तर त्यांच्याबरोबर आलेल्या व्यक्तींनाही शाल, श्रीफळ दिले जाते. परंतु, प्रत्यक्षात या शाल आणि श्रीफळचा उपयोग काहीच होत नाही. काही व्यक्ती त्या शाल असेच ठेवून देतात.
त्यामुळे यापुढे महत्त्वाच्या व्यक्तींना “महाराष्ट्र दर्शन’ हे पुस्तक देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या पुस्तकात 30 लेखकांनी राज्यातील विविध देवस्थान, पर्यटनस्थळ याविषयीची सविस्तर माहिती असलेले लेख लिहिलेले आहेत. या लेखामुळे त्या देवस्थान किंवा पर्यटनाचा इतिहास काय आहे, याची माहिती मिळतेच तसेच मार्गदर्शनही होते. त्यामुळे हे पुस्तक वाचनीय आहे. नक्कीच त्याचा सर्वांना फायदा होईल. त्यामुळे हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, याची सुरुवात शनी शिंगणापूर देवस्थान येथून करत असल्याचे सह धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांनी सांगितले.
पुस्तक भेट देऊन सन्मान करण्याचा उपक्रम शनी शिंगनापूर देवस्थान येथे सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी “महाराष्ट्र दर्शन’ हे पुस्तक भेट देण्यात येणार आहे. या उपक्रमानंतर अन्य देवस्थानेही अशाप्रकारचा उपक्रम हाती घ्यावा. जेणेकरून आपल्या राज्याची माहिती, इतिहास भाविकांपर्यंत पोहोचले.
– दिलीप देशमुख, सह धर्मादाय आयुक्त, पुणे