पिंपरी – खासगी सावकारी करून व्याजापोटी भलीमोठी रक्कम मागितली. तसेच धमकी देऊन जबरदस्तीने जागेच्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या. तसेच वाहनांची परस्पर विक्री करून फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चिंचवड विधानसभा उपाध्यक्षास अटक करण्यात आली आहे.
बाळकृष्ण अंबादास पवार (वय 35, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शहाजी हनुमंत कवितके, हनुमंत कवितके (दोघेही रा. चिखली), शहाजी कवितके यांचा अनोळखी साथीदार, सचिन तानाजी निंबाळकर (रा. चिंचवडगाव) व विजय वसंतराव ढुमे (रा. चिंचवडगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन निंबाळकर हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहाजी कवितके, हनुमंत कवितके आणि एक अनोळखी व्यक्तीने फिर्यादीकडे व्याजापोटी 22 लाख रुपये रकमेची मागणी केली.
पैसे न दिल्यास व्यवसाय करू देणार नाही. तसेच तुला व तुझ्या कुटुंबाला खलास करून टाकू, अशी धमकी दिली. फिर्यादी यांना त्यांच्या कार्यालयातून ओढून बाहेर नेत कारमधून डांगे चौक येथे नेले. आंबेठाण चाकण येथे असलेल्या 70 लाख रुपये किमतीच्या सात गुंठे जागेची इसार पावती आणि रिलीज डील दस्त तयार करून त्यावर जबरदस्तीने फिर्यादी यांना सही करण्यास भाग पाडले.
फिर्यादी पवार यांचा वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी आरोपी विजय ढुमे आणि सचिन निंबाळकर यांच्या ऑडी कार विक्री करण्यासाठी विकत घेतल्या होत्या. मात्र त्या कारची पुढे विक्री करायची असल्याने पवार यांनी त्या स्वतःच्या नावावर करून घेतल्या नव्हत्या. कवितके याने त्या कार पवार यांच्या ताब्यातून ओढून आणल्या. त्या कार निंबाळकर आणि ढुमे यांच्या नावावर असल्याने त्यांना आणखी एक लाख रुपये देऊन ट्रान्सफर अर्जावर त्यांच्या स्वाक्षरी घेतल्या.
विजय ढुमे आणि सचिन निंबाळकर यांना कोणतेही कायदेशीर हक्क नसताना फिर्यादी यांच्या परस्पर तेच गाड्यांचे मूळ मालक असल्याचे भासवून त्यांच्या संमतीने आरटीओची कार्यालयाची दिशाभूल करून व खोटे कागदपत्रे सादर करून दोन गाड्या शहाजी कवितके यांच्या नावावर ट्रान्सफर करून फिर्यादी यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.