ऑडिटमधील हस्तलिखीत आक्षेप यापुढे कालबाह्य

संगणक प्रणालीवरील यादीसह आक्षेपाचे कारण नमूद करणे आवश्‍यक

पुणे – राज्य शासनाच्या विविध विभागांची बिले मंजूर करताना अनेक बाबींवर आक्षेप घेतला जातो. त्यासाठी संबंधित कागदपत्रांवर हस्तलिखीत आक्षेप चिठ्ठीवर नोंदविण्याची पद्धत आता कालबाह्य झाली आहे. त्याकरिता आक्षेपाची सविस्तर सूची “ट्रेझरीनेट’ प्रणालीमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार तयार होणारी आक्षेप चिठ्ठी जोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्याचे लेखा व कोषागार संचालक ज.र. मेनन यांनी हे आदेश दिले आहेत. सर्वच प्रशासकीय विभागांची बिले अदा करण्यासाठी ती राज्य लेखा व कोषागारे संचालनालयाकडे सादर केली जातात. या देयकांचे लेखापरीक्षण आणि त्रुटी दूर करुन ती पारित केली जातात. या प्रक्रियेत या बिलांवर हस्तलिखीत आक्षेप चिठ्ठी जोडून ही फाइल परत पाठवली जाते.

मात्र, काही अधिकाऱ्यांना असे अधिकार नसतानाही हेतुपुरस्सर आक्षेप लावण्याची बाब समोर आली आहे. यामध्ये अधिकाऱ्यांचा खोडसाळपणा कारणीभूत ठरत असून, त्यामुळे बिले अदा करण्यास उशीर होण्यासह साधनसामग्री आणि वेळेचा अपव्यय होत आहे.

अशी असणार प्रक्रिया
आढळलेला आक्षेप यादीतून निवडून त्याची संगणक प्रणालीतून प्रिंट घेऊन, ती संबंधित फाइलसोबत जोडावी. प्रणालीतील आक्षेपांशिवाय अन्य आक्षेप असल्यास, संबंधित अधिकाऱ्याच्या निर्णयानुसार हा आक्षेप लावण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यावर हा आक्षेप लावण्याची गरज का होती आणि नव्या आक्षेपाचा संगणक प्रणालीमध्ये समावेश करण्याच्या प्रस्ताव थेट संचालनालयाला सादर करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.