राजेंद्र भुजबळ
शिर्डी – एकीकडे साईबाबांच्या झोळीत कोट्यवधींच्या देणगीची वाढ झाली, तर दुसरीकडे स्थानिक व्यावसायिकांच्या अर्थकारणाचा गाडा अजूनही फसलेलाच आहे. याच मुख्य कारण म्हणजे शिर्डी गावाला शहराचा दर्जा प्राप्त झाला असला, तरी शहरातील बाजारपेठा विकसित होण्यासाठी ठोस विकास आराखड्याची गरज आहे.
शिर्डी येथील नागरिक खरेदीसाठी श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर, नाशिक, राहाता या शहरांत जातात. त्याचे कारण म्हणजे कोणतीही वस्तू खरेदी करताना कंपनी, ब्रॅंड, गुणवत्ता, व्हरायटीज, शोरूम, पार्किंग या ग्राहकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबी आहेत. शिर्डीत मात्र वेगवेगळ्या ठिकाणी कपडे, बूट, चप्पल, क्रॉकरी, सौंदर्य प्रसाधने, सोने-चांदीची दुकाने आणि किराणा मालाचे दुकाने आहेत. मात्र, ही सर्व दालने एकाच नाही, तर वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळतात. हीच सेवा जर ग्राहकांना वेगवेगळ्या शोरूमच्या माध्यमातून निर्माण झाली, तर शिर्डीच्या बाजारपेठेची एक नवी ओळख निर्माण होऊ शकते. कोणतीही बाजारपेठ ही ग्राहकांच्या विश्वासावरच अवलंबून असते.
शहराप्रमाणे कापड मार्केट, सोन्या चांदीचे मार्केट, शू पॅलेस, क्रॉकरी, सौंदर्य प्रसाधने, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तू, किराणा माल यांची भव्य शोरूम्स ग्राहकांना आकर्षित तर करतातच; परंतु आपल्या मनासारख्या वस्तू खरेदी करण्याचे समाधानही त्यांना या माध्यमातून मिळते. सध्या शिर्डीत साडीची चाळीसहून जास्त झगमगते शोरूम्स आहेत. मात्र, या ठिकाणी फसवणूक होत असल्याच्या चर्चेला आता वाचा फुटली आहे. सिटी मार्केटसारखे किराणा मालाचे दालन शिर्डीकरांना विश्वासाचे ठिकाण ठरले आहे.
रिलायन्स मॉल, सिजन चॉईस मॉल हे गावाबाहेर असले, तरी तेथेही ग्राहकांचा कल मोठ्या प्रमाणात आहे. कारण येथे एकाच दालनात सर्व संसारोपयोगी वस्तू, तसेच कपडे, बूट चप्पल, किराणा यासह नवनवीन ब्रॅंड ग्राहकांना आकर्षित करतात. एकंदरीतच शिर्डीच्या आजवरच्या इतिहासात नॉव्हेल्टी, हारप्रसाद, लॉजिग, रेस्टॉरंट, फास्ट फूड याव्यतिरिक्त कोणत्याही व्यवसायाला पसंती न दिल्याने शिर्डीत भक्कम अशी विश्वसनीय बाजारपेठ आजपावेतो उभी राहू शकली नाही, हे एक दुर्दैव म्हणावे लागेल.
शिर्डीत साईसमाधी मंदिराव्यतिरिक्त भाविकांना मनोरंजनाचे, पर्यटनाचे साधन नसल्याने भाविक सहसा मुक्कामी थांबत नाही. समृद्धी महामार्ग सुरू झाल्यावर ही परिस्थिती अजून चिंताजनक होईल की काय, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
– संदीप सोनवणे, हॉटेल व्यावसायिक, शिर्डी
बाजारपेठेचे स्वप्न अधुरेच!
हळूहळू शिर्डीतील तरुण आता नवीन संकल्पनेच्या आधारावर अनेक नवनवीन प्रोजेक्ट मार्केटमध्ये उतरत असले, तरी दुकानाचे न परवडणारे भाडे, पार्किंगची असुविधा आणि ग्राहकांचा ओघ नसल्याने अनेकांचे शिर्डीतील मोठ्या बाजारपेठेचे स्वप्न आजही अधुरेच राहिले आहे