खासगी कंपन्यांना सरकारकडून तंबी

लघु उद्योगांची देणी लवकर चुकती करण्याच्या सूचना 

नवी दिल्ली – लघु उद्योगावर परिणाम होऊ नये यासाठी केंद्र सरकार शक्‍य त्या सर्व उपाययोजना करीत आहे. या उद्योगांना तीन लाख कोटी रुपयांच्या कर्जाची हमी केंद्र सरकारने दिली आहे. त्याचबरोबर या उद्योगांची देणी सर्वांनी वेळेवर द्यावीत याबाबत लघु उद्योग मंत्रालय आग्रही आहे. 

लघु उद्योगाची सरकारी विभाग आणि कंपन्यांकडील देणी गेल्या तीन महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चुकती करण्यात आली आहेत. त्याचबरोबर मोठ्या खासगी कंपन्यांनीही लघु उद्योगाची देणी अडकवून न ठेवता शक्‍य तितक्‍या लवकर चुकती करावीत, अशा सूचना खासगी कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. लघु उद्योगाचा जीव छोटा असतो. हे उद्योग बॅंकांकडून आणि इतर क्षेत्रातून महागडे कर्ज घेऊन वस्तूचे उत्पादन करतात.

मात्र, या उद्योगाची देणी देण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे या उद्योगांना व्याजाचा अतिरिक्‍त बोजा सहन करावा लागतो. त्याचबरोबर या उद्योगात निर्माण होणाऱ्या रोजगारावर परिणाम होतो. याची गंभीर दखल केंद्र सरकारने लघु उद्योगांना बळकट करण्याचे ठरविले आहे. या उद्योगांना त्यांची देणी लवकर मिळावीत यासाठी कायदेशीर मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत पॅकेज जाहीर केले आहे. त्यामध्ये लघु उद्योगांची काळजी घेण्यात आली आहे. या उद्योगांना भांडवलपुरवठा करण्याबरोबरच सर्वांनी या उद्योगाची 45 दिवसांच्या आत देणी द्यावी असा नियम तयार करण्यात आला आहे. त्यानुसार केंद्र सरकारच्या मंत्रालयानी आणि सरकारी कंपन्यांनी या उद्योगाची 10 हजार कोटी रुपयांची देणी अगोदरच दिली आहेत. आता खासगी कंपन्यांनी सरकारी कंपन्यांप्रमाणे लघु उद्योगाची देणी द्यावी याबाबत केंद्र सरकार आग्रही आहे.

पाचशे कंपन्यांना पत्र
भारतातील सर्वांत मोठ्या 500 कंपन्यांना लघुउद्योग मंत्रालयाने पत्र पाठविले आहे. त्याचबरोबर ई-मेल केले आहेत. या उद्योगांनी लघुउद्योगाचे त्यांच्याकडील देणे असेल तर ते पाहावे आणि चुकते करावे असा आग्रह या पत्रामध्ये करण्यात आला आहे. ही आर्थिक शिस्त बाळगणे का गरजेचे आहे, याचे स्पष्टीकरण पत्रात करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.